मुंबई : बँकेत टाकलेला चेक वटण्यासाठी आता दोन-तीन दिवस वाट पाहावी लागणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ४ ऑक्टोबरपासून चेक क्लिअरिंगची नवी पद्धत सुरू करणार आहे. यामुळे बँकेत दिलेले चेक काही तासांतच वटवले जातील. सध्या लागणारे दोन दिवसांचे अंतर आता काही तासांवर येणार आहे.
नवीन नियम दोन टप्प्यांत लागू होतील. पहिल्या टप्पा ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ हा असेल. यात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत चेक स्वीकारले जातील. बँकांना मिळालेले चेक लगेच स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसला पाठवावे लागतील. दुसऱ्या बँकेने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चेक मंजूर किंवा नामंजूर असल्याचे कळवावे लागेल. वेळेत उत्तर न दिल्यास चेक आपोआप मंजूर मानला जाईल.
दुसऱ्या टप्पा ३ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल. चेक मिळाल्यानंतर जास्तीत जास्त तीन तासांच्या आत त्याला मंजुरी द्यावी लागेल. उदाहरणार्थ, सकाळी १० ते ११ दरम्यान मिळालेल्या चेकसाठी दुपारी २ वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागेल. वेळेत मंजुरी न दिल्यास चेक मंजूर मानून सेटलमेंटमध्ये धरला जाईल. सेटलमेंट झाल्यावर बँकेने ग्राहकाला पैसे लगेच, पण कमाल एका तासात द्यावे लागतील.