लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चामड्याच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध ‘एस्बेडा’ला पर्स विकत घेतलेल्या ग्राहकाकडून पर्सची किंमत त्यावर कॅरी बॅगचे २० रुपये आकारणे महागात पडले. याबाबत मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ‘एस्बेडा’ला ३५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
तक्रारदार रीना चावला यांनी ४ ऑगस्ट २०१९ रोजी फिनिक्स मार्केटमधून ‘एस्बेडा’च्या शोरूममधून १,६९० रुपयांची पर्स विकत घेतली. ती पर्स ठेवण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या कॅरी बॅगचे स्वतंत्र २० रुपये आकारले. तसेच या कॅरी बॅगवर ‘एस्बेडा’चा लोगो होता. तो कंपनीची जाहिरात करण्यासाठी होता, असे चावला यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत चावला यांनी ॲड. प्रशांत नायक यांच्याद्वारे ग्राहक मंचात तक्रार केली होती.
ग्राहक मंचाने ‘एस्बेडा’ची बाजू ऐकण्यासाठी नोटीस बजावली. स्टोअर व्यवस्थापकाने त्यांचे वकीलही ग्राहक मंचापुढे उभे केले नाहीत. त्यामुळे ग्राहक मंचाचे अध्यक्ष आर. जी. वानखेडे व सदस्य एस. व्ही. कलाल यांनी ही सुनावणी एकतर्फीच चालवली.
न्यायालयाचा आदेश ग्राहकांना मोफत कॅरी बॅग न पुरविता त्यांच्याकडून २० रुपये आकारणे, ही सेवेची कमतरता आणि अनुचित व्यापारी प्रथा आहे. कॅरी बॅगसाठी आकारलेले २० रुपये परत करा. सुनावणीसाठी आलेल्या खर्चापोटी तक्रारदाराला ३ हजार रुपये आणि झालेल्या मानसिक, शारीरिक छळापोटी १० हजार रुपये असे एकूण १३ हजार २० रुपये परत करण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले तसेच ग्राहक कल्याण निधीमध्ये २५ हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले.