Join us

चंदा कोचर यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 14:17 IST

व्हिडीओकॉन समूहाचे व्ही. एन. धूत यांना कर्ज देताना आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येते, असा स्पष्ट ठपका मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने ठेवला आहे.

मुंबई  - व्हिडीओकॉन समूहाचे व्ही. एन. धूत यांना कर्ज देताना आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येते, असा स्पष्ट ठपका मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने ठेवला आहे. व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांना त्यांचे पती दीपक कोचर यांच्यामार्फत लाभ मिळाल्याचेही दिसून येते, असे न्यायालयाने म्हटले आहे.या प्रकरणी दीपक कोचर यांना अटक झालेली असून, चंदा कोचर व धूत यांना १२ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर व्हावयाचे आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्राची दखल घेऊन न्यायाधीशांनी म्हटले की, तपास संस्थेने जे दस्तावेज सादर केले आहेत, त्यावरून गुन्हा घडल्याचे दिसून येते. या दस्तावेजांच्या आधारे आरोपींविरुद्ध खटला चालविला जाऊ शकतो. 

बेकायदेशीररीत्या कर्ज मंजुरीचा आरोपचंदा काेचर यांनी मे २००९ मध्ये आयसीआयसीआय बँकेचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला १,८७५ कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररीत्या मंजूर केल्याचा आरोप आहे. हे कर्ज २०१७ मध्ये एनपीएमध्ये गेले. या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांना व्हिडीओकॉनकडून ६४ कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉन समूहातील एक कंपनी ‘नूपॉवर रिन्युएबल्स’च्या माध्यमातून हा पैसा दीपक कोचर यांच्या कंपनीला मिळाला, असे ईडीने म्हटले आहे. 

टॅग्स :चंदा कोचर