Join us

केंद्र सरकारकडून स्मार्टफोन निर्मीतीला चालना; माेबाइलचा बाजार होणार ४.२९ लाख काेटींचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:31 IST

येत्या वर्षात फोनची सरासरी किंमत असेल २५,७०० रुपयांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत स्मार्टफोन निर्मीतीला चालना दिल्याने हा उद्योग दिवसेंदिवस वेगाने विस्तारत आहे. उत्पादन वाढल्याने भारताचा स्मार्टफोन बाजार २०२५ पर्यंत ५० अब्ज डॉलर्स म्हणजेच ४.२९ लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काऊंटरपॉईंट या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. 

काऊंटरपॉईंटने जरी केलेल्या अहवालानुसार भारतात स्मार्टफोनची किरकोळ बाजारातील सरासरी किंमत या वर्षी पहिल्यांदाच २५,७०० रुपयांहून अधिक होण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये देशातील स्मार्टफोन बाजारातील उलाढाल ३७.९ अब्ज डॉलर्सच्या (३.२५ लाख कोटी रुपये) घरात जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

३० हजारांच्या फोनचा वाटा किती?

येणाऱ्या वर्षात ३० हजारांपेक्षा अधिक किंमत असलेल्या फोनचा वाटा २० टक्के इतका असण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात ग्राहकांची पसंती ऑनलाइनप्रमाणेच ऑफलाईन स्टोअर्समधून स्मार्टफोन खरेदीकडे असेल. 

चीनमधील प्रमुख कंपन्यांचे प्रमाण किती?

  • विवो, ओप्पो आणि वन प्लस यांसारखे चिनी ब्रँड या वर्षात ३० हजार ते ४५ हजार या श्रेणीतील स्मार्टफोन बाजारात उतरवतील.
  • उत्तम कॅमेरा आणि इतर फीचर्स ही यातील प्रमुख आकर्षणे असतील.
  • वन प्लस ही कंपनी मदरबोर्ड आणि डिस्प्ले बाबतच्या तक्रारींचे निराकरण करून भारतीय बाजारात पुन्हा स्थिर होताना दिसत आहे.
  • कंपनीने निर्मितीप्रकल्पात तब्बल ६,००० कोटींची गुंतवणूक केली आहे.

प्रमुख ब्रँड्स कोणते? : प्रिमियम आणि अल्ट्रा प्रिमियम श्रेणीमध्ये ॲपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा असेल. २०२४ या आर्थिक वर्षात ॲपल कंपनीला भारतात फोनच्या विक्रीतून ६७,१२१ कोटींचा महसूल मिळाला. सॅमसंग कंपनीने ७१,१५७ कोटी रुपयांची कमाई केली होती.

टॅग्स :स्मार्टफोनकेंद्र सरकार