Join us

महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:17 IST

DA Hike: खासदार आनंद भदोरिया यांनी संसदेत महागाई भत्त्याच्या थकबाकीचा प्रश्न उपस्थित केला. सरकारने यावर काय उत्तर दिले ते जाणून घेऊया.

DA Hike : कोरोना साथीच्या काळात, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीचे (DR) १८ महिन्यांचे ३ हप्ते थांबवले होते. हे पैसे मिळणार की नाही, याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता सरकारने यावर संसदेत स्पष्ट उत्तर दिले आहे, ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का बसला आहे.

सरकारने का थांबवली होती थकबाकी?खासदार आनंद भदौरिया यांनी लोकसभेत याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ या काळात देशाची अर्थव्यवस्था खूप वाईट अवस्थेत होती. सरकारी तिजोरीवर मोठा दबाव होता. अशा परिस्थितीत, खर्च कमी करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता राखण्यासाठी हे तीन हप्ते थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

थकबाकी परत मिळणार का?सरकारला विचारले असता, थांबवलेले डीए आणि डीआर कधी दिले जातील, यावर पंकज चौधरी म्हणाले की, कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि कल्याणकारी योजनांवरील अतिरिक्त खर्च यामुळे सरकारवर अजूनही मोठा आर्थिक भार आहे. त्यामुळे, सध्या ही थकबाकी देणे शक्य नाही. याचा अर्थ सरकारने ही थकबाकी देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

रिपोर्टनुसार, या १८ महिन्यांच्या थकबाकीतून सरकारने सुमारे ३४,४०२ कोटी रुपये वाचवले होते. त्यामुळे, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता हे पैसे परत मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

वाचा - ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

महागाई भत्ता (DA) म्हणजे काय?महागाई भत्ता (DA) हा सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी देते. महागाई वाढल्यावर खरेदीशक्ती कमी होते, ती भरून काढण्यासाठी हा भत्ता दिला जातो. पेन्शनधारकांना असाच लाभ महागाई मदत (DR) च्या रूपात मिळतो.

टॅग्स :सरकारी योजनाशासन निर्णयसरकारी नोकरीनिवृत्ती वेतन