Join us

यंत्रे, फायलींचे भंगार विकून सरकारने कमावले १,१६३ कोटी; रेल्वेला मिळाले सर्वाधिक पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 08:19 IST

ऑक्टोबर २०२३ मध्ये मिळाली चंद्रयान-३ मोहिमेच्या खर्चाएवढी रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२१ ते आतापर्यंत सरकारी कार्यालयांतील ‘स्वच्छता अभियान’च्या माध्यमातून केंद्र सरकारने रद्दी, जुन्या फायली, तसेच जुन्या यंत्रसामग्रीचे भंगार विकून तब्बल १,१६३ कोटी रुपये उभे केले आहे. एकट्या ऑक्टोबर २०२३ मध्ये विकलेल्या भंगारातून सरकारला ‘चंद्रयान-३ मोहिमे’ला लागलेल्या एकूण खर्चाएवढी रक्कम मिळाली आहे. एका अहवालानुसार, चंद्रयान ३ मोहिमेवर ६०० कोटी रुपयांचा खर्च झाला होता, तर ऑक्टोबरमध्ये रद्दी व भंगारच्या विक्रीतून ५५७ कोटी रुपये सरकारला मिळाले आहेत. 

रेल्वेला सर्वाधिक पैसे

प्राप्त माहितीनुसार, यंदा ऑक्टोबरमध्ये विकण्यात आलेल्या रद्दी व भंगारातून सर्वाधिक २२५ कोटी रुपये रेल्वे विभागास प्राप्त झाले आहेत. त्याखालोखाल संरक्षण मंत्रालयातील रद्दीतून १६८ कोटी, पेट्रोलियम मंत्रालयाच्या रद्दीतून ५६ कोटी आणि कोळसा मंत्रालयास ३४ कोटी रुपये मिळाले.

लाखो चौरस फूट जागा रिकामी

ऑक्टोबर २०२१ पासून आतापर्यंत ९६ लाख जुन्या फायली रद्दीत फेकल्याने ३५५ लाख चौरस फूट जागा मोकळी झाली आहे. चंद्रयान-३ मोहिमेचा एकूण खर्च ६०० कोटी रुपये होता. आश्चर्याची बाब म्हणजे अवकाश मोहिमांवर आधारित अनेक हॉलिवूडपटाचा खर्चही ६०० कोटी रुपयांच्या आसपास असतो. 

टॅग्स :मध्य रेल्वेभारतीय रेल्वे