Join us

आखातातील नोकऱ्यांसाठी केंद्र देणार कौशल्य प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 07:17 IST

skills training : काैशल्य आणि उद्याेजकता विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या काैशल्य विकास महामंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या काैशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : परदेशांमध्ये आणि त्यातही विशेषत: आखाती देशांत निर्माण होणाऱ्या रोजगारांसाठी लागणारे कौशल्य भारतीयांकडे असावे, यासाठी केंद्र सरकारने जाेरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी  ‘तेजस’ हा नवा काैशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यातून जे कौशल्य मिळेल, त्यामुळे पहिल्या टप्प्यात १० हजार भारतीय कर्मचाऱ्यांना वर्षभरात संयुक्त अरब अमिरातीमधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल.

काैशल्य आणि उद्याेजकता विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या काैशल्य विकास महामंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या काैशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची संख्या वाढविण्यात येणार आहे. मात्र, परदेशात ज्या राेजगाराच्या संधी उपलब्ध होतात, ते पाहून तसे कौशल्य भारतीयांकडे असावे, याकडे सरकार लक्ष केंद्रित करणार आहे. 

त्यासाठी परदेशात लागणाऱ्या कौशल्याचे विशेष प्रशिक्षण भारत सरकारच्या यंत्रणांमार्फत देण्यात येणार आहे. ‘तेजस’च्या माध्यमातून सध्या राबविण्यात येत असलेले प्रशिक्षण आणि पंतप्रधान काैशल्य केंद्र, आयटीआय व इतर काैशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे याेग्य उमेदवारांची पुरेशी संख्या मिळणे सुलभ हाेईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

या क्षेत्रात संधीबांधकाम क्षेत्र, इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर्स, वेल्डर्स याशिवाय मालवाहतूक, लाॅजिस्टिक्स, आदरातिथ्य, रिटेल, आयटी, अर्थ आणि आराेग्य सेवांमध्ये नाेकरीच्या संधी निर्माण हाेणार आहेत.

भारतीयांसाठी ३.६ दशलक्ष संधीभारतीयांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढील पाच वर्षांमध्ये ३.६ दशलक्ष राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी २.६ दशलक्ष संधी या आखाती देशांसह युराेप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया आणि मलेशिया या देशांमध्ये निर्माण हाेतील. अमेरिकेमध्ये आधीपासूनच भारतीय तंत्रज्ञांना मोठी मागणी आहे.

टॅग्स :नोकरी