Join us

अ‍ॅमेझॉनला झटका, रिलायन्स- फ्युचर ग्रुपच्या डीलला CCI कडून मंजुरी

By ravalnath.patil | Updated: November 21, 2020 08:48 IST

CCI approves Future Group-Reliance Retail deal : अ‍ॅमेझॉननेही या कराराबद्दल सेबीकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्देफ्यूचर-रिलायन्स कराराविरूद्ध अ‍ॅमेझॉन कायदेशीर लढाई लढत आहे. फ्यूचर ग्रुप आणि अ‍ॅमेझॉन यांच्यातील प्रकरण दिल्ली हाय कोर्टातही विचाराधीन आहे.

नवी दिल्ली : अमेरिकन प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला (Amazon) मोठा धक्का बसला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील कराराला मंजुरी दिली आहे.

दरम्यान, रिलायन्स समूहाने ऑगस्टमध्ये फ्युचर ग्रुपचा रिटेल, होलसेल, वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक्स व्यवसाय घेण्यासाठी 24,713 कोटी रुपयांच्या करार केला होता. अ‍ॅमेझॉन कंपनी या कराराला विरोध करीत असून सिंगापूर लवादाच्या कोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता.

सीसीआयने शुक्रवारी ट्विट करून सांगितले की, फ्युचर ग्रुपच्या रिटेल, घाऊक आणि लॉजिस्टिक व्यवसायाला रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाइफस्टाईल लिमिटेडद्वारे अधिग्रहण करणाऱ्या या कराराला मंजुरी दिली आहे. सीसीआय बाजारातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी आणि स्पर्धा ठेवण्यासाठी नियामक म्हणून काम करते.

फ्युचर -रिलायन्स कराराविरूद्ध अ‍ॅमेझॉन कायदेशीर लढाई लढत आहे. फ्युचर ग्रुप आणि अ‍ॅमेझॉन यांच्यातील प्रकरण दिल्ली हाय कोर्टातही विचाराधीन आहे. शुक्रवारी दिल्ली हाय कोर्टाने फ्युचर ग्रुपच्या करारामध्ये अ‍ॅमेझॉनचा हस्तक्षेप करण्याच्या स्थगितीच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला. त्यावर संबंधित पक्षांना आपला लेखी प्रतिक्रिया सादर करण्यासाठी कोर्टाने 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

अ‍ॅमेझॉननेही या कराराबद्दल सेबीकडे तक्रार केली आहे. सिंगापूर लवाद कोर्टाने आपल्या अंतरिम निर्णयामध्ये फ्युचर ग्रुप आणि मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजमधील 24,713 कोटी रुपयांच्या कराराचा आढावा घेताना त्यावर स्थगिती दिली होती.

टॅग्स :व्यवसायरिलायन्सअ‍ॅमेझॉन