Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचं ओझं लवकर कमी करता येतं का? आपण भरतो त्या हप्त्यातून व्याज कमी करण्याच्या आहेत अनेक युक्त्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 06:43 IST

बँकेकडून रक्कम घेण्याआधीच नीट करा नियोजन... वाचतील लाखो रुपये

आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना गृहकर्जाचा डोंगर अनेकदा चिंतेचा विषय ठरतो. मात्र, थोड्या नियोजनाने तुम्ही या व्याजाच्या चक्रातून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवल्याने सध्या गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये मोठी कपात होण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी ‘एक अतिरिक्त हप्ता’ भरण्याची युक्ती तुमच्यासाठी लाखो रुपयांची बचत करणारी ठरू शकते.

तुम्ही दरवर्षी नियमित १२ हप्त्यांऐवजी एक अतिरिक्त १३ वा ईएमआय भरला, तर कर्जाचा कालावधी (टेन्यूअर) लक्षणीयरीत्या कमी होतो. उदाहरणार्थ, जर तुमचे १ कोटींचे कर्ज २५ वर्षांसाठी असेल, तर केवळ एका जादा हप्त्यामुळे हे कर्ज २०.५ वर्षांतच संपू शकते. यामुळे तुमच्या कर्जाच्या मुदतीत साडेचार वर्षांची बचत तर होतेच; पण तब्बल ३२.३ लाख रुपयांचे व्याजही वाचते.

अशीच एक दुसरी पद्धत आहे, ती म्हणजे बँकेने तुम्हाला ईएमआयपोटी ठरवलेली रक्कम पहिल्या हप्त्यापासून भरताना त्यात जमल्यास किमान १ हजार ते २ हजार रुपये वाढवा. ही वरची रक्कम तुमच्या थेट मुद्दलमधून घटेल आणि त्यावरचे संपूर्ण कर्ज मुदतीचे व्याजही वाचेल. असे केले तर लाखो रुपये वाचतातच शिवाय कर्जही अनेक वर्ष आधीच फेडले जाते.  पुढील गुंतवणुकीसाठी त्याचा मोठा फायदा होतो.

फॉर्म्युला ५-२०-३०-४०

०५

घराची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ पटपेक्षा जास्त नसावी. यामुळे कर्जाचा आर्थिक ताण वाढत नाही.

२० गृहकर्जाचा कालावधी

२० वर्षांपेक्षा जास्त नसावा. कालावधी जास्त असेल तर व्याजही अधिक भरावे लागते.

३०

घर खरेदी करताना किमान ३० टक्के रक्कम स्वतःकडून (डाऊन पेमेंट) भरावी. यामुळे कर्जाची रक्कम कमी होते आणि व्याजात बचत होते.

४०

तुमचा मासिक ईएमआय ही निव्वळ मासिक उत्पन्नाच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. यामुळे दैनंदिन खर्च आणि बचत व्यवस्थित करता येते.

कालावधी अन् ईएमआय कसा कराल कमी?

कालावधी कमी ठेवा

घरकर्ज घेताना जास्त वर्षांऐवजी कमी वर्षांचा पर्याय निवडा. ईएमआय थोडा जास्त येईल, पण एकूण व्याज खूप कमी भरावे लागेल.

फायदे : कमी व्याज लागते. लवकर कर्जमुक्त होता.

तोटा : दर महिन्याची ईएमआय जास्त.

जमेल तेव्हा प्री-पेमेंट करा

बोनस, इन्कम टॅक्स रिफंड किंवा बचत असेल, तर त्यातून कर्जात थोडी रक्कम भरा. यामुळे थेट मूळ रक्कम कमी होते.

फायदे : मोठी व्याज बचत. कर्जाचा कालावधी कमी होतो.

तोटा : अतिरिक्त पैसे नेहमीच नसतात

स्टेप-अप ईएमआय

सुरुवातीला ईएमआय कमी असतो व पगार वाढला तसा ईएमआय हळूहळू वाढतो.

फायदे : सुरुवातीला ईएमआय सांभाळणे सोपे. उत्पन्न वाढीशी जुळते.

तोटा : पुढील काळात जास्त ईएमआयसाठी नियोजन लागते.

मध्ये - मध्ये रक्कम भरा

मोठी रक्कम हातात आली (बक्षीस, बोनस) तर एकरकमी कर्जात भरा.

फायदे : मूळ रक्कम (मुद्दल) पटकन कमी होते. व्याजात मोठी बचत

तोटा : अशी संधी क्वचितच मिळते

रिफायनान्स करा

इतर बँक कमी व्याजदर देत असेल तर कर्ज तिकडे ट्रान्सफर करा.

फायदे : ईएमआय कमी होऊ शकते. एकूण कर्ज स्वस्त पडते.

तोटा : काही शुल्क, कागदपत्रे लागतात.

शक्य तेव्हा ईएमआय वाढ

पगार वाढला की ईएमआय थोडा वाढवा. ही वाढ पुढे खूप फरक पडते.

फायदे : कर्ज लवकर फेडले जाते. व्याज कमी भरावे लागते.

तोटा : आर्थिक शिस्त ठेवावी लागते.

सवलतींचा योग्य वापर करा

गृहकर्जावर करसवलत मिळते. ही  वाचलेली रक्कम ईएमआयसाठी वापरा.

फायदे : कर कमी भरावा लागतो. हातात जास्त पैसे राहतात.

तोटा : कर नियम बदलत राहतात.

एक ‘एक्स्ट्रा ईएमआय’ भरल्याने...

१ कोटीचे कर्ज : ४.५ वर्षे लवकर संपेल आणि ३२.३ लाखांचे व्याज वाचेल.

७५ लाखांचे कर्ज : ४.२ वर्षे लवकर संपेल आणि २४.२ लाखांचे व्याज वाचेल.

५० लाखांचे कर्ज : ४ वर्षे आधी पूर्ण होईल आणि १६.१ लाखांची बचत होईल.

३० लाखांचे कर्ज : ३.८ वर्षे लवकर फिटेल आणि ९.५ लाखांचे व्याज वाचेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Pay off loan faster: Smart tips to reduce interest burden.

Web Summary : Reduce your home loan burden with these smart strategies. Paying one extra EMI annually, increasing EMI amount, or pre-payments can significantly cut interest and shorten loan tenure.
टॅग्स :बँक