नवी दिल्ली : स्टार्टअप आणि ई-कॉमर्स कंपन्यांनी आयआयटी आणि अन्य नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत यंदाची कॅम्पस भरती सुरू केली असून ८ लाख रुपयांपासून १ कोटी रुपयांपर्यंत वेतनाचे प्रस्ताव नवपदवीधरांना मिळत आहेत. गेल्या दोन वर्षांत टेक व स्टार्टअप्समध्ये लाखाे लाेकांच्या नाेकऱ्या गेल्या हाेत्या. त्यामुळे नव्या वर्षात चित्र बदलणार असल्याचे दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मीशो, फोनपे आणि मिंत्रा यासारख्या बड्या स्टार्टअप कंपन्यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय झोमॅटो, फ्लिपकार्ट, ओला, गेम्सक्राफ्ट, हायलॅब्स, क्विकसेल, इंडस इनसाइट्स, ग्रो, विंजो, कार्स २४ आणि नोब्रोकर या कंपन्याही यंदा कॅम्पस भरतीत सहभागी झाल्या आहेत. या कंपन्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), बिट्स पिलानी, बिरला इन्स्टिट्यूट ऑफ कॅम्पस आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यासारख्या मान्यवर महाविद्यालयांत कॅम्पस भरती करीत आहेत.
आयआयटींमध्ये रविवारी या हंगामातील कॅम्पस भरती सुरू झाली. अनेक कंपन्यांना १६ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक वेतनाचे प्रस्ताव दिले आहेत.
बोनस, बदली भत्त्याचाही प्रस्ताव : स्टार्टअप कंपन्या नवपदवीधरांना बोनस व विविध भत्ते देऊ करीत आहेत. जॉयनिंग बोनस, व्हेरिएबल पे, बदली भत्ता असे पर्याय त्यांना दिले जात आहेत.
या क्षेत्रात सर्वाधिक भरती
सॉफ्टवेयर डेवलपमेंट
डाटा सायन्स
प्रॉडक्ट ॲनालिटिक्स
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
मशीन लर्निंग