Join us

मुकेश अंबानींच्या एन्ट्रीनं कोल्ड्रिंग मार्केटमध्ये धमाका, Campa Cola लॉन्च होताच 'कोका-कोला'नं किंमत केली कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 18:10 IST

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी सातत्यानं आपल्या व्यवसायात विस्तार करत आहेत.

नवी दिल्ली-

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी सातत्यानं आपल्या व्यवसायात विस्तार करत आहेत. अंबानींनी गेल्या वर्षी कोल्ड्रिंग मार्केटमध्ये नशीब आजमवण्याचं ठरवलं आणि रिलायन्सनं आता ७० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय ब्रँड कॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर लॉन्च करत बाजारात जोरदार एन्ट्री केली आहे. मुकेश अंबानी यांच्या एन्ट्रीनं आता कोला मार्केटमध्ये किमतीवरुन चढाओढ सुरू झाली आहे आणि दुसऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. 

२२ कोटींमध्ये केली होती कॅम्पा कोलाची डीलरिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्सद्वारे २०२२ मध्ये प्युअर ड्रिंक्स ग्रूपकडून कॅम्पा कोलाची डील २२ कोटी रुपयांना झाली होती. या डीलनंतर दिवाळीमध्ये प्रोडक्ट लॉन्च होणार असल्याची योजना आखण्यात आली होती. पण त्यात वाढ करुन होळी २०२३ करण्यात आली. अखेर कॅम्पा कोलानं ऑरेंज, लेमन आणि कोला फ्लेवरमध्ये कोल्ड्रिंक लॉन्च केलं आहे. कॅम्पा कोलाची थेट टक्कर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पेप्सी, कोका-कोला आणि स्प्राइट या कंपन्यांसोबत आहे. 

कोका-कोलानं केली किमतीत घटकॅम्पा कोलानं तीन फ्लेवरमध्ये उत्पादन लॉन्च केल्यानंतर कोला मार्केटमध्ये दबदबा असलेल्या इतर कंपन्यांवर दबाव वाढलेला दिसत आहे. यातच वाढतं तापमान आणि सॉफ्ट ड्रिंकची वाढती  मागणी लक्षात घेता कोला-कोला कंपनीनं आपल्या उत्पादनाच्या किमतीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये कोका-कोलाच्या उत्पादनाच्या किमतीत घट झाली आहे. बिझनेस स्टँडर्डच्या माहितीनुसार कंपनीनं 200ML च्या बाटलीवर ५ रुपये कमी केले आहेत. 

कोण-कोणत्या राज्यात किमती केल्या कमीरिपोर्टनुसार, कोका-कोला कंपनीनं किमतीत घट करण्याच्या निर्णयानंतर मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 200ML ची १५ रुपयांना मिळणारी बाटली आता १० रुपयांना मिळणार आहे. याशिवाय कोला-कोला कंपनीच्या काचेच्या बाटल्या ठेवणाऱ्या होलसेल विक्रेत्यांना कॅरेट डिपॉझिट देखील भरावं लागणार नाही. हे सर्वसाधारणपणे ५० ते १०० रुपये इतकं कॅरेट डिपॉझिट असायचं.

टॅग्स :मुकेश अंबानी