Join us  

Byju's च्या संकटासाठी बायजू रवींद्रन आणि गुंतवणूकदार जबाबदार, एक सडलेलं सफरचंद.., रॉनी स्क्रूवालांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 4:30 PM

गेल्या काही दिवासांपासून एडटेक स्टार्टअप बायजूसच्या नावाची चर्चा आहे. सध्या बायजूस मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे.

Byju's Crisis: गेल्या काही दिवासांपासून एडटेक स्टार्टअप बायजूसच्या नावाची चर्चा आहे. सध्या बायजूस मोठ्या आर्थिक संकटात सापडली असून कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना अनेक प्रयत्न करावे लागत आहे. दरम्यान, गुंतवणूकदार, चित्रपट निर्माता आणि एज्युकेशन स्टार्टअप UpGrad चे सहसंस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी बायजूसच्या कारभारावर जोरदार टीका केलीये. 

बायजूसचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन आणि सुमारे ५१ गुंतवणूकदार एडटेक स्टार्टअप बायजूच्या संकटाला एकत्रितपणे जबाबदार आहेत, असं रॉनी स्क्रूवाला म्हणाले. गुरुग्राममधील ASU+GSV अँड एमेरिटस समिटच्या दुसऱ्या सीझनमध्ये बोलताना, स्क्रूवाला म्हणाले, “मला कोणताही सीएफओ दिसत नाही असं विचारण्यापेक्षा गुंतवणूकदारांना बोर्ड मीटिंगमध्ये तुमचा सेकंडरी कधी आहे हे विचारणं अधिक महत्त्वाचं वाटलं. केवळ एकच पैलू संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी अडथळे निर्माण करेल, असं वाटत नाही,' असं रॉनी स्क्रूवाला म्हणाले. एक सडलेलं सफरचंद इतर फळांवर जसा परिणाम करतं तसा यामुळे संपूर्ण एडटेक सेक्टरवर परिणाम होता कामा नये, असंही त्यांनी नमूद केलं. 

... त्या निर्णयावर स्क्रूवाला ठाम 

भारतातील एडटेक क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी स्क्रूवाला यांनी या आठवड्यात दिल्लीतील एडटेक संस्थापकांसोबत बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी, बायजूचे सध्याचे मॅनेजमेंट हटवण्यासाठी आणि बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी एक एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलावण्याच्या बायजूसच्या प्रमुख भागधारकांच्या निर्णयाला स्क्रूवाला यांनी समर्थन दिलं. या प्रकरणात आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्याने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X ची मदत घेतली होती. बायजूच्या गुंतवणूकदारांमध्ये जनरल अटलांटिक, सोफिना, पीक एक्सव्ही पार्टनर्स आणि प्रोसस यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. 

"तुम्हाला योग्य प्रश्न विचारण्याची गरज" 

"तुम्ही एक सक्रिय बोर्ड सदस्य असणं आवश्यक आहे, तुम्हाला योग्य प्रश्न विचारण्याची गरज आहे. १० कोटी डॉलर्स ते ४ अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर कोणी प्रश्न विचारणं का थांबवतो? तुम्हाला तसं करण्याचा अधिकार आहे. जर त्याच कंपन्यांमधील लोकांनी चार वर्षांपूर्वी ते प्रश्न विचारले असते जे ते आता विचारू लागले आहेत, तर आज परिस्थिती निराळी असती. कदाचित असंही झालं असतं, चार अब्ज डॉलर्स जे जमवले होते, तेही जमले नसते. गुंतवणूकदार आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी आता त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडणे, योग्य प्रश्न विचारणं आणि त्यांच्या गुंतवणुकीचं संरक्षण करणं आवश्यक आहे," असंही स्क्रूवाला म्हणाले.

टॅग्स :व्यवसायशिक्षण