Join us  

Budget 2019: अर्थसंकल्पपूर्व खबरदारीने बाजारात झाली पडझड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:49 AM

लोकसभा निवडणुकांमुळे गुंतवणूकदारांनी स्वीकारलेली सावध भूमिका आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा पडणारा प्रभाव यामुळे शेअर बाजारात गेल्या आठवड्यात ट्रेंड संमिश्र राहिला.

- प्रसाद गो. जोशीयेत्या आठवड्यात सादर होणारा हंगामी अर्थसंकल्प, आस्थापनांनी जाहीर केलेले संमिश्र तिमाही निकाल, परकीय वित्तसंस्थांकडून चालू असलेली विक्री, तसेच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे गुंतवणूकदारांनी स्वीकारलेली सावध भूमिका आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा पडणारा प्रभाव यामुळे शेअर बाजारात गेल्या आठवड्यात ट्रेंड संमिश्र राहिला. मात्र आठवड्यात बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये घट झालेलीच बघावयास मिळाली आहे.मुंबई शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. संवेदनशील निर्देशांकाने वाढीव पातळीवर प्रारंभ केला. त्यानंतर तो ३६७०१.०३ ते ३५९५३.१५ अंशांदरम्यान हेलकावत अखेरीस ३६०२५.५४ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा तो ३६१.०७ अंश (०.९९ टक्के) खाली येऊन विसावला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही सप्ताहात अस्थिरता दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक १०,७८०.५५ अंशांवर बंद झाला. निफ्टीने १०८०० अंशांची पातळी न राखल्याने बाजारावर काहीसे दडपण आले हे नक्कीच. आठवड्याच्या अखेरीस मिडकॅप ३४१.५७ अंशांनी (२.२७ टक्के) खाली येऊन १४,६८१.८२ अंशांवर तर स्मॉलकॅप ५०४.४० अंशांनी (३.४८ टक्के) कमी होत १४,०००.२० अंशांवर बंद झाला आहे.गेल्या आठवड्यामध्ये जाहीर झालेली काही आस्थापनांची तिमाही कामगिरी निराशाजनक दिसल्याने बाजारात विक्रीचा जोर वाढला. देशी वित्तसंस्थांनी विक्री केली, तर परकीय वित्तसंस्थांनी थोडी खरेदी केली. मात्र संपूर्ण महिन्याचा विचार करता परकीय वित्तसंस्थांनी विक्रीच केलेली दिसून येते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ चांगली राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र आगामी सप्ताहातील हंगामी अर्थसंकल्प आणि निवडणुकांमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत विक्रीचा मार्ग पत्करलेला दिसून आला.सोन्याच्या ईटीएफमधून पैसे काढणे सुरूचगुंतवणूकदारांनी सोन्याच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडामधून (ईटीएफ) पैसे काढणे सुरूच ठेवले आहे. सन २०१८मध्ये अशा फंडांमधून ५७१ कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत. यामुळे या फंडांच्या व्यवस्थापनाखालील रक्कम सुमारे सहा टक्कयांनी कमी झाली आहे. या फंडांमधून गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचे हे सलग सहावे वर्ष आहे. असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अ‍ॅम्फी)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील सोन्याशी संबंधित १४ इटीएफमधून गुंतवणूकदारांनी ५७१ कोटी रुपये काढून घेतले आहेत. यामुळे या फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ४५७१ कोटी रुपये एवढी झाली आहे. 

टॅग्स :शेअर बाजारव्यवसायअर्थसंकल्प 2019