Join us  

Budget 2020: उपनगरी प्रवाशांची निराशा; ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, बांधकाम क्षेत्रात नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 11:43 PM

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पडसाद समाजाच्या विविध वर्गात उमटत आहेत.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पडसाद समाजाच्या विविध वर्गात उमटत आहेत. मध्यमवर्गीयांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच वेळी उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही, यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच अर्थसंकल्पात गृहबांधणी क्षेत्रात चालू असलेल्या सवलतींना फक्त एक वर्षाचा अजून अवधी दिला आहे. या व्यतिरिक्त कोणतीही सवलत मिळालेली नाही. काही उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे. पालघरमधील मान्यवरांच्या प्रतिक्रिया...

योजना चांगल्या, पण...

या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कृषी विकासासाठी १६ सूत्रीय योजना, १५ लक्ष कोटी रुपये कर्जासाठी ठेवणे, तसेच शेती सिंचनासाठी सोलरची जोडणी या अर्थसंकल्पातील योजना चांगल्या आहेत, मात्र त्यांची शेतकऱ्यांच्या हितासाठी अंमलबजावणी व्हावी.

- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

महासत्ता होण्याच्या आशा धूसर

भारताच्या अर्थसंकल्पातून जनतेला मोठ्या आशा होत्या. पण त्या मावळल्याच. या अर्थसंकल्पातून दिसत असून जीडीपीचा दर १० घसरून ५ वर आल्याने जागतिक महासत्ता होण्याच्या आता आशा धूसर आहेत. असे असताना आता तरी शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात केलेली तरतूद कागदावर न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी.

- ओनील आल्मेडा, अध्यक्ष, वसई विरार शहर काँग्रेस

शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प

कृषिक्षेत्रासाठी २.८३ लाख कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकºयांना सोलर पंप देणार असल्याने नैसर्गिक उर्जा स्रोतांचा पुरेपूर वापर करण्यावर भर देण्यात येणार असून वीज बचत होईल. नाशवंत शेती उत्पादन जलदगतीने बाजारात पोहोचण्यासाठी किसान रेल, कृषी उडाण या उपक्रमाद्वारे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक उपलब्ध करून देणार असल्याचा फायदा होईल. २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांना जोडव्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत १६ कलमी कार्यक्रम राबवला जाईल. सेंद्रिय खते वापरण्यासाठी, पारंपरिक बियाणे वापरण्यास शेतकºयांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. २०२० पर्यंत जनावरांसाठी १०८ मिलियन टनापर्यंत चारा उपलब्ध करण्यात येईल. शिवाय मच्छिमार बांधवांसाठी सागर मित्र योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसायात समुद्रकिनारी राहणाºया तरुणवर्गाला रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीला पूरक असे बजेट आहे.

- प्रा. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ,कोसबाड कृषी विज्ञान केंद्र, डहाणू

सुंदर अर्थसंकल्प 

वार्षिक अर्थसंकल्प हा देशाला व जनतेला दिशा देण्यासाठी असतो. या माध्यमातून समाजाने आर्थिक बाबतीत कसे वागावे याबाबत कोपरखळी मारण्याची संधी मिळत असते. वैयक्तिक आयकरात जीवन विमा, मेडीक्लेम, गृहकर्जावरील हप्ता यावर वजावट न मागितल्यास आयकरचा दर कमी लावण्याचा नवीन पर्याय देऊन ही संधी अर्थमंत्र्यांनी गमावली आहे.

फिस्कल डेफिसीट ३.८ टक्के असल्याची कबुली देऊन हे आर्थिक वर्ष सरकारसाठी चांगले गेले नाही. यावर शिक्कामोर्तब झाले. परंतु त्याचबरोबर पुढील आर्थिक वर्षांचा विकास दर १० टक्के होईल व हे फिस्कल डेफिसीट ३.५ टक्क्यावर आणू असे स्वप्नही दाखवण्यात आले आहे.

- भरत धोंडे, चार्टर्ड अकाउंटंट,पालघर

मंदी जाण्यास अनुकूल वातावरण

आधुनिकतेची कास धरत नवीन दशकात भारताला नवभारताकडे नेणे आवश्यक असून सुधारणावादी अर्थसंकल्प होणे गरजेचे आहे तसेच बांधकाम मंदी म्हणा किंवा पायाभूत सुविधा निर्मिती व या क्षेत्रात रोजगार निर्माणासाठी मोठ्या संधी निर्माण होणे आवश्यक आहे. यामुळे मंदी जाण्यास अनुकूल वातावरण होईल.

- वीरेंद्र मेहता, बांधकाम व्यावसायिक, वसई

निर्यातीस चालना देणारा अर्थसंकल्प

निर्यातीस चालना देणारा अर्थसंकल्प आहे. तसेच सामान्य वर्गाला शिक्षण व उत्तम शिक्षण यांच्या संधी या अर्थसंकल्पामुळे मिळतील. तर शिक्षण, वैद्यकीय महसूल कर प्रणाली असा सर्वसमावेश प्रयत्न असला तरी हा अर्थसंकल्प रोजगार व उद्योग यांना साजेसा आहे. खासकरून शेती व ग्रामीण विकास तरतुदीबाबत मागील वेळीही घोषणा करण्यात आली, मात्र अंमलबजावणी काही झाली नाही, तरी यावेळी तसे होता कामा नये.

- डॉ माल्कम पेस्टनजी, गोल्डन पार्क हॉस्पिटल, वसई

शेतकरी वर्गाची निराशा

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष काही तरतूद व योजना किंवा पॅकेज नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाची निराशा झाली आहे.

- काशीराम रसाळ, शेतकरी, ओसरविरा

गृहकर्ज कंपन्यांना फक्त आश्वासन

अर्थसंकल्पात गृहबांधणी क्षेत्रात चालू असलेल्या सवलतींना फक्त एक वर्षा$चा अजून अवधी दिला आहे. या व्यतिरिक्त कोणतीही सवलत मिळालेली नाही. रियल इस्टेट क्षेत्राला सध्याच्या मंदीतून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. गृहकर्ज कंपन्यांना मदत करू, असे फक्त आश्वासन मिळालेले आहे. आयकरात मिळणाºया सवलतींसाठी घर खरेदी करणाºयांच्या संख्येत घट होणार असल्याने सेकंड होम खरेदी कमी होणार आहे. गृहबांधणी क्षेत्राला पर्यायाने देशाला मदत करण्याची एक संधी अजून या निमित्ताने गमावल्याचे दिसून येते.

- निशांत प्रभाकर पाटील (आर्किटेक्ट) वास्तुशिल्प असोसिएटस, पालघर.

अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

या अर्थसंकल्पात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ९ हजार ५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावरून ज्येष्ठ नागरिकांकडे सरकारचे लक्ष असल्याचे दिसून येते. बँकेतील ठेवीबाबत निर्णय जाहीर करताना ५ लाख रुपयांच्या ठेवीवर ५ लाखाची गॅरंटी मिळणार असून बँक दिवाळखोरीत गेल्यास हा फायदा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. आपल्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम बँकेत ठेवून त्यावर मिळालेल्या व्याजावर उदरनिर्वाह करणाऱ्या ज्येष्ठांना फायदा होणार आहे.

- अशोक भाटिया, पूर्व अध्यक्ष, वसई-विरार सिनीयर सिटीझन असोसिएशन 

टॅग्स :बजेटबजेट क्षेत्र विश्लेषणबजेट तज्ञांचा सल्लानिर्मला सीतारामननरेंद्र मोदी