Join us  

Budget 2018 : सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर हे वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 12:27 PM

1 फेब्रुवारी म्हणजे उद्या अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं या अर्थसंकल्पानंतर...

नवी दिल्ली - जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर येत्या अर्थसंकल्पाची वाट बघा. 1 फेब्रुवारी म्हणजे उद्या अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. केंद्र सरकारचा हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प असेल. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका अपेक्षित असून, त्यामुळे संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही.  सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं या अर्थसंकल्पानंतर स्वस्त होऊ शकतं. अर्थसंकल्पानंतर सोनं स्वस्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

अर्थमंत्री अरूण जेटली येत्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करू शकतात. त्यामुळे सोनं  600 ते 1200 रूपयांनी स्वस्त होऊ शकतं. अर्थसंकल्पात अरूण जेटली याबाबतचा निर्णय घेऊ शकतात अशी दाट शक्यता इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) वर्तवली आहे.सोन्याच्या आयात शुल्कात 2 ते 4 टक्के कपात होऊ शकते असं  असोसिएशनचे उपाध्यक्ष सौरभ गाडगीळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सातत्याने सोन्याच्या वाढत्या किंमतींवर लगाम लागेल तसंच सोनं खरेदी करणं स्वस्त होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे.

भारतामध्ये विक्री होणा-या सोन्याच्या 95 टक्क्यांहून जास्त सोनं आयात केलं जातं, आणि आयात केलेल्या सोन्यावर 10 टक्के आयात शुल्क लागू होतं.  सध्या 10 ग्राम सोन्यासाठी 31000 रूपये द्यावे लागतात. जर आयात शुल्क एक टक्क्याने जरी कमी झालं तरी प्रति 10 ग्राम सोन्याच्या खरेदीत तुमची 300 रूपयांची बचत होऊ शकते.  सरकारनं जर हे पाऊल उचललं तर सामान्या व्यक्तीला याचा फायदा होईलच पण यामुळे सोन्याच्या तस्करीवर देखील आळा बसेल असं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :अर्थसंकल्प २०१८बजेट 2018 संक्षिप्तअर्थसंकल्पीय अधिवेशनअरूण जेटलीसंसदसोनं