Join us

शेअर बाजार गडगडला; 1200 अंकांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 09:56 IST

आज बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी कोसळला.

अमेरिकन भांडवली बाजारातील नकारात्मक घडामोडींमुळे मुंबई शेअर बाजारात मंगळवारी सकाळी मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सकाळी बाजार उघडण्यापूर्वी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी तर निफ्टी 300 अंकांनी खाली कोसळला. गेल्या काही काळात भारतीय भांडवली बाजारात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

तत्पूर्वी सोमवारी अमेरिकन भांडवली बाजारातील डाऊ जोन्सचा औद्योगिक निर्देशांक 1,175.21 अंकांनी घसरला. त्यामुळे डाऊ जोन्समध्ये 1600 अंकांची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. यामुळे भारतीय बाजारातील धास्तावलेल्या गुंतवणुकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला. परिणाम सेन्सेक्स तब्बल 2.89 टक्के तर निफ्टी 3.48 टक्क्यांनी खाली आला. भारतीय भांडवली बाजाराच्या गेल्या काही काळातील कामगिरीची तुलना करायची झाल्यास सेन्सेक्स दीड महिन्यांपूर्वीच्या 33,482 या निचांकी पातळीला पोहोचला, तर निफ्टीचीही 10,276.30 च्या पातळीपर्यंत घसरण झाली. दुसरीकडे आशियाई भांडवली बाजारही चांगलेच गडगडले. 2011 नंतर आशियाई बाजारात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. जगभरातील शेअर बाजारांसाठी आजचा दिवस काळा ठरत आहे. जपानचा निक्केई हा निर्देशांक 4.6 टक्क्यांनी कोसळला. ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. 

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी