Join us

संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार

By जयदीप दाभोळकर | Updated: May 14, 2025 13:07 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षात तुर्कस्तान आणि अझरबैजाननं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या देशांविरोधात नाराजी असून या देशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षात तुर्कस्तान आणि अझरबैजाननं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या देशांविरोधात नाराजी असून या देशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. या दोन्ही देशांशी भारताचे चांगले व्यापारी संबंध आहेत. तुर्कस्तान आणि अझरबैजानबरोबरचा आपला वार्षिक व्यापार सुमारे १२ अब्ज डॉलर्सचा आहे. विशेषत: तुर्कस्तानच्या बाबतीत ट्रेड बॅलन्स भारताच्या बाजूनं आहे. अलीकडे या देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या वाढलीये. पण या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं त्याचा फटका बसू शकतो. एका अंदाजानुसार, तुर्कस्तान आणि अझरबैजाननं गेल्या वर्षी भारतीय पर्यटकांकडून ४,००० कोटी रुपये कमावले.

काही ट्रॅव्हल वेबसाईट्स भारतीयांना अत्यावश्यक असल्याशिवाय तुर्कस्तान आणि अझरबैजानला जाणं टाळण्याचा सल्ला देत आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानमधून सफरचंद खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. #BoycottTurkey सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. गोवा विलासने तुर्कस्तानातील नागरिकांना गोव्यात राहण्याची सोय न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ट्रॅव्हल एजंट लोकांना तुर्कस्तानऐवजी ग्रीसला जाण्याचा सल्ला देत आहेत. त्याचप्रमाणे उदयपूरमधील मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानसोबतचा आपला व्यवसाय संपुष्टात आणल्याचं म्हटलं आहे.

'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये

भारत-तुर्कस्तान व्यापार

गेल्या काही वर्षांत भारत आणि तुर्कस्तान यांच्यातील व्यापार वाढला आहे. २०२२-२३ मध्ये दोन्ही देशांमधील एकूण व्यापार १३.८ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. मात्र, २०२३-२४ मध्ये त्यात किंचित घट झाली आणि हा व्यापार १०.४३ अब्ज डॉलरवर पोहोचला. यापैकी भारताने ६.६५ अब्ज डॉलर्सच्या वस्तू विकल्या आणि ३.७८ अब्ज डॉलर्सचा माल खरेदी केला. म्हणजेच व्यापार संतुलन भारताच्या बाजूनं आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांनी एकमेकांमध्ये गुंतवणूक केली आहे.

भारत तुर्कस्तानला कार, रसायनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात करतो. भारत तुर्कस्तानमधून इंधन, मशिनरी, सिमेंट आणि ड्रायफ्रूट्स आयात करतो. तुर्कस्तानच्या अनेक कंपन्या भारतात लोकप्रिय होत आहेत. यामध्ये गोदिवा, उल्कर आणि एलसी वायकिकी यांचा समावेश आहे. तिकडच्या स्किनकेअर आणि पर्सनल केअर ब्रँडही भारतात शिरकाव करत आहेत.

एप्रिल २००० ते डिसेंबर २०२३ या कालावधीत तुर्कस्तानचा भारतात एकूण एफडीआय २२७.५ मिलियन डॉलर होती. ऑगस्ट २००० ते मार्च २०२४ या कालावधीत भारतीय कंपन्यांनी तुर्कस्तानमध्ये सुमारे २०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली. गेल्या वर्षी सुमारे दोन लाख ७५ हजार भारतीय पर्यटकांनी तुर्कस्तानला भेट दिली होती. या काळात त्यांचा सरासरी खर्च १.२ लाख रुपये होता. तुर्कस्तानच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी भारतीय पर्यटक खूप महत्त्वाचे आहेत. लग्नसमारंभासाठी तुर्कस्तान हे भारतीयांचं आवडतं ठिकाण ठरत आहे.

भारतातील लोक लग्नासाठी तुर्कस्तानच्या इस्तंबूलची निवड करतात. अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे डेस्टिनेशन वेडिंग करता येतं. रिपोर्टनुसार, तुर्कस्ताननं २०२२ मध्ये सुमारे १,००० विवाह आयोजित केले होते, ज्यात भारतातील जोडप्यांची संख्या सर्वात जास्त होती. तर 2024 मध्ये तुर्कस्तानमध्ये जवळपास ५० भारतीय जोडप्यांनी लग्न केलं होतं. दरम्यान, राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला यांनीही तुर्कस्तानमध्ये भारतीयांच्या डेस्टिनेशन वेडिंगवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

अझरबैजानशी संबंध

अझरबैजाननंही उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. भारत या देशाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करतो. २०२३ मध्ये भारत अझरबैजानकडून कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतानं या देशाकडून १.२२७ बिलियन डॉलरचं कच्चं तेल खरेदी केलं. २००५ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार फक्त ५० मिलियन डॉलर होता, जो २०२३ मध्ये वाढून १.४३५ अब्ज डॉलर झाला. सरकारी आकडेवारीनुसार भारतानं अझरबैजानकडून १.२३५ अब्ज डॉलर्सचा माल खरेदी केला आणि २०१ मिलियन डॉलर्सची उत्पादनं विकली.

अझरबैजानच्या पर्यटन उद्योगासाठीही भारत अतिशय महत्त्वाचा आहे. देशात अलीकडच्या काळात भारतीय पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सन २०२३ मध्ये १.१७ लाख भारतीय पर्यटकांनी अझरबैजानला भेट दिली. २०२२ मध्ये ही संख्या ६०,७३१ होती, तर २०२४ मध्ये ही संख्या २.४३ लाखांवर पोहोचली. दिल्लीहून अझरबैजानची राजधानी बाकूसाठी दर आठवड्याला १० थेट उड्डाणं आहेत. यामध्ये इंडिगोची सात आणि अझरबैजान एअरलाइन्सच्या तीन विमानांचा समावेश आहे. रशिया, तुर्कस्तान आणि इराणनंतर सर्वाधिक भारतीय पर्यटक अझरबैजानला जात आहेत.

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपाकिस्तान