राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आपला मोठा मुलगा आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केलीये. लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. तेज प्रताप यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. लालू प्रसाद यादव यांनी या निर्णयामागे तेजप्रताप यांचं बेजबाबदार वर्तन आणि नैतिक मूल्यांची अवहेलना कारणीभूत असल्याचं म्हटलंय. कायम वादाच्या भोवऱ्यात असणारे लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजिव पैशांच्या बाबतीत खूप ताकदवान आहेत. जानेवारी २०२५ पर्यंत जवळपास ४ कोटींची संपत्ती असलेले तेजप्रताप यादव यांच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. हे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होतं.
प्रतिज्ञापत्रानुसार, तेजप्रताप यादव यांची एकूण संपत्ती सुमारे ३.५८ कोटी रुपये आहे. यात शेतजमीन आणि घरांव्यतिरिक्त अनेक स्थावर मालमत्ताही आहेत. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू सेडान, स्कोडा स्लाविया (२२ लाख) आणि होंडा सीबीआर १००० आरआर सुपरबाइक (१५.४५ लाख रुपये) आहे. याशिवाय गोपालगंज जिल्ह्यातील फुलवरिया आणि पाटणा येथे ही त्यांची शेती आणि निवासी जमीन आहे. त्यांच्यावर १८ लाख ५४ हजार रुपयांचं कर्ज असल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
शॉपिंगची मोठी आवड
संपत्तीव्यतिरिक्त तेजप्रताप यादव यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या उत्पन्नाचाही खुलासा केला होता. त्यानुसार आमदार म्हणून मिळणारा पगार आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न हेच त्यांच्या उत्पन्नाचं साधन आहे. तेजप्रताप यांनी आपल्या एका मुलाखतीत त्यांना शॉपिंगची खूप आवड असल्याचं म्हटलं होतं.
नितीश सरकारमध्ये मंत्री
तेजप्रताप यादव हे बिहारमधील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे वडील लालूप्रसाद यादव आणि आई राबडी देवी हे दोघेही बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तेजप्रताप यादव यांचा जन्म १६ एप्रिल १९८८ रोजी गोपालगंज येथे झाला. २०१५ मध्ये महुआ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली होती. त्यानंतर नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये त्यांना आरोग्यमंत्री करण्यात आलं. जुलै २०१७ पर्यंत ते या पदावर होते.
२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत तेजप्रताप यांनी समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तिथूनही विजय मिळवला. १६ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांना बिहार सरकारमध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री करण्यात आलं. २८ जानेवारी २०२४ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते.