Join us

अवघ्या 10 मिनिटांत रुग्णवाहिका दारात उभी राहणार, Blinkit ने सुरू केली नवीन सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 21:57 IST

क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Blinkit ने आपल्या अॅपद्वारे Ambulance सेवा सुरू केली आहे.

Blinkit : क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Blinkit ने एक मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत Blinkit वरुन दैनंदिन वापराच्या वस्तू मागवल्या जायच्या, पण आता यावरुन Ambulance बोलवता येणार आहे. गुरुग्राममध्ये आजपासून ही सेवा सुरू होत असल्याची माहिती कंपनीने दिली. ब्लिंकिटने सांगितल्यानुसार, येत्या काळात ही सेवा इतर शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. गुरुग्रामसाठी सध्या पाच रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत लोक ब्लिंकिट ॲपद्वारे रुग्णवाहिका बोलवू शकतात.

ब्लिंकइटमध्ये रुग्णवाहिका बुक करण्यासाठी बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) पर्याय जोडण्यात आला आहे. ॲम्ब्युलन्समध्ये कोणत्या सुविधा दिल्या जाणार, याबाबत ब्लिंकिटने माहिती दिली. कंपनीने केलेल्या पोस्टमध्ये 2000 रुपयांमध्ये रुग्णवाहिका मागवता येईल, असे लिहिले आहे. मात्र, त्यात व्हेंटिलेटरचा सपोर्ट नाही. ब्लिंकिटच्या रुग्णवाहिकेत जीवन रक्षक उपकरणे असतील. यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, ऑटोमॅटिक एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर(AED), स्ट्रेचर, मॉनिटर, सक्शन मशीन आणि इतर आपत्कालीन औषधांचा समावेश आहे.

प्रत्येक रुग्णवाहिकेत पॅरामेडिक, सहाय्यक आणि प्रशिक्षित ड्रायव्हर असेल. कंपनीला या सेवेतून नफा कमवायचा नाही, त्यामुळेच ही सेवा परवडणाऱ्या किमतीत ठेवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. भविष्यात कंपनी त्यात गुंतवणूकही करणार आहे. ब्लिंकिटच्या मते, ही सेवा हळूहळू वाढवली जाईल. येत्या दोन वर्षांत प्रत्येक मोठ्या शहरात ही सेवा उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. दरम्यान, ब्लिंकिटने रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी रेड हेल्थसोबत भागीदारी केली आहे. रेड हेल्थ, ही एक रुग्णवाहिका सेवा देणारी कंपनी आहे, जी 24/7 रुग्णवाहिका सेवा देते.

टॅग्स :व्यवसायवैद्यकीय