मुंबई: युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या दृष्टीहीन कर्मचाऱ्याच्या मदतीला सरसावली. छोंझिन आंगमो, असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून, बँकेने त्यांना माउंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. हे पाऊल आपल्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि धाडसी आकांक्षा, नेतृत्वाला प्रेरणा देण्यासाठी बँकेची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. मणिमेखलाई यांनी छोंझिन आंगमो यांच्या जिद्दीचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच दिल्ली येथील झोनल कार्यालयात त्यांना 56 लाख रुपयांचा धनादेशही सुपूर्द केला.
विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2024 मध्ये माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेत सहभागी झाल्यानंतर छोंझिन यांची माउंट एव्हरेस्ट मोहीम 2025 साठी निवड करण्यात आली. छोंझिन आंगमो माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या दृष्टीहीन गिर्यारोहक बनणार आहेत.
आंगमो यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, ज्यात अॅडव्हेंचर बियॉन्ड बॅरियर फाउंडेशन एनजीओची खारदुंग ला पास सायकलिंग स्पर्धा आणि सप्टेंबर 2022 मध्ये झालेली कानम पीक मोहिमेचा समावेश आहे. त्यांनी जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेला सियाचीन ग्लेशियरची मोहिमदेखील यशस्वीरित्या पार केली आहे. विशेष क्षमता असूनही त्यांनी प्रचंड धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास दाखवल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.