Join us

पासपोर्ट तयार करण्यासाठी आता अनिवार्य करण्यात आलंय 'हे' डॉक्युमेंट, याशिवाय होणार नाही काम

By जयदीप दाभोळकर | Updated: March 4, 2025 12:12 IST

केंद्र सरकारनं भारतात पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पाहा सरकारनं कोणता केलाय बदल.

केंद्र सरकारनं भारतातपासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी जन्माचा दाखला (Birth Certificate) बंधनकारक करण्यात आला आहे. म्हणजेच आता या लोकांना पासपोर्ट बनवण्यासाठी इतर कोणत्याही कागदपत्राऐवजी फक्त जन्मदाखला सादर करावा लागणार आहे.

पासपोर्टसाठी महत्त्वाची कागदपत्रे

भारतात परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट जारी केले जातात, त्यासाठी देशभरात ३६ पासपोर्ट कार्यालयं आहेत. पासपोर्ट बनवण्यासाठी ओळखीचा पुरावा, रहिवासाचा पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा यासह काही महत्त्वाची कागदपत्रं सादर करावी लागतात. यापूर्वी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड किंवा आधार कार्ड अशा कागदपत्रांचा वापर केला जात होता. परंतु आता सरकारनं त्यात बदल केला असून १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी केवळ जन्मदाखला वैध कागदपत्र मानला आहे.

नवा नियम कोणाला लागू होणार?

हा नवा नियम फक्त १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्यांनाच लागू असेल. अशा लोकांसाठी पासपोर्ट बनवण्यासाठी जन्म दाखला बंधनकारक असेल आणि त्याशिवाय त्यांना पासपोर्टसाठी अर्ज करता येणार नाही. १ ऑक्टोबर २०२३ पूर्वी जन्मलेले लोक अजूनही आपल्या जन्मतारखेची पडताळणी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड यासारख्या पर्यायी कागदपत्रांचा वापर करू शकतात.

पासपोर्ट अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावी, हा सरकारच्या या बदलाचा उद्देश आहे. जन्म दाखले सक्तीचे केल्यास कागदपत्रांची सत्यता निश्चित करता येईल आणि फसवणुकीची शक्यता कमी होईल. तसंच यामुळे पासपोर्ट अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि प्रभावी होणार आहे.

पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा

पासपोर्टसाठी ऑनलाइन किंवा जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात (POPSK) जाऊन अर्ज केले जाऊ शकतात. अर्जानंतर पोलीस पडताळणी प्रक्रिया केली जाते, ती यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट जारी केला जातो.

टॅग्स :पासपोर्टभारतसरकार