Join us  

बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान, पण हा पैसा जातो कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 5:53 PM

शेअर मार्केट कोसळते म्हणजे नेमके काय होते ? गुंतवणुकदारांचा पैसा नेमका जातो कुठे ? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे...

शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, बुडालेला हा पैसे कुठे जातो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? तुमचे झालेले नुकसान दुसऱ्यांच्या खात्यात नफा म्हणून जाते का? तर, उत्तर नाही. बुडालेला हा पैसा गायब होतो. होय, तुम्ही बरोबर वाचल आहे. या बाबात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शेअरचे मूल्य त्याच्या कंपनीच्या कामगिरीवर आणि तोटा आणि नफ्याचे मूल्यांकन यावर अवलंबून असते. जर गुंतवणूकदार आणि बाजार विश्लेषकांना वाटत असेल की, एखादी कंपनी भविष्यात चांगली कामगिरी करू शकते, तर तिच्या शेअर्सची खरेदी वाढते आणि बाजारात तिची मागणीही वाढते. त्याचप्रमाणे, एखाद्या कंपनीला भविष्यात नफा कमी होईल किंवा व्यवसायात मंदी येईल असे भाकीत केले तर तिचे शेअर्स कमी किमतीत विकले जातात. बाजार मागणी आणि पुरवठा या सूत्रावर काम करतो. त्यामुळे, दोन्ही प्रकरणांमध्ये शेअर्सचे मूल्य वर किंवा खाली जाते.

दुसऱ्या मार्गाने समजून घ्या...बाजारात खरा पैसा नसतो आणि शेअरचे मूल्य हे त्याचे मूल्यांकन असते. समजा आज तुम्ही 100 रुपयांना शेअर खरेदी केले आणि दुसऱ्या दिवशी कंपनीचे मूल्यांकन बदलले ज्यामुळे शेअरचे मूल्यांकन 80 रुपयांपर्यंत खाली आले. आता हे शेअर्स विकल्यावर तुम्हाला 20 रुपयांचा तोटा झाला आहे, पण जो व्यक्ती ते खरेदी करेल त्याला थेट फायदा मिळणार नाही. होय, जर त्या शेअरचे मूल्यांकन पुन्हा 100 रुपये झाले, तर ते विकून 20 रुपये नफा नक्कीच होईल.

बाजार कसा काम करतो?

शेअर बाजार हा भावनेचा खेळ आहे, असे म्हणतात. याचा अर्थ, शेअरची किंमत गुंतवणूकदारांच्या भावनांनुसार ठरवली जाते. उदाहरणार्थ- एखाद्या कंपनीने कॅन्सरचे औषध बनवण्यासाठी पेटंट घेतले असेल, तर भविष्यात त्याचा व्यवसाय आणि कमाई नक्कीच वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटते. या विश्वासापोटी ते कंपनीचे शेअर्स खरेदी करू लागतात. बाजारात त्याची मागणी वाढली की भाव वाढू लागतात. म्हणजेच, कंपनीबद्दलच्या भावनेमुळे तिचे मूल्यांकन अचानक वाढते. याला अंतर्भूत मूल्य म्हणतात, तर कंपनीचे वास्तविक मूल्य तिच्या एकूण भांडवलामधून दायित्वे वजा करुन निश्चित केले जाते. याला एक्स्प्लिसिट व्हॅल्यू म्हणतात.

7 दिवसांत 17.23 लाख कोटी रुपये बुडाले, याचा अर्थ काय?

बाजारातील सततच्या घसरणीमुळे गेल्या 7 व्यापार दिवसांत गुंतवणूकदारांचे 17.23 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. म्हणजे कुणाच्या खिशात जाण्याऐवजी कंपन्यांचे मूल्यांकन कमी झाल्याने हा पैसा हवेतच विरला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 17 जानेवारी रोजी 280.02 लाख कोटी रुपये होते, जे 25 जानेवारी रोजी 262.78 लाख कोटी रुपयांवर आले आहे. 

 

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय