Join us

UPI द्वारे व्यवहार करणाऱ्यांना मोठा धोका! SBI नं दिला इशारा, पाहा काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:19 IST

SBI On UPI Payment : भारतात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये ही वाढ होत आहे. आता यूपीआयमधून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

SBI On UPI Payment : भारतात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये ही वाढ होत आहे. आता यूपीआयमधून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जर तुम्हीही यूपीआयमधून पैसे पाठवत असाल किंवा घेत असाल तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. भारतात अनेक जण ऑनलाइन व्यवहारांसाठी यूपीआयचा वापर करतात. देशभरात दररोज लाखो यूपीआय व्यवहार होतात, ज्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयनं आपल्या ग्राहकांना टेक्स्ट मेसेजद्वारे इशारा दिला असून यूपीआय फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. फसवणुकीची ही प्रकरणं झपाट्यानं वाढत असून ती टाळण्यासाठी ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं बँकेनं म्हटलंय. 'प्रिय एसबीआय ग्राहकांनो, अनपेक्षित डिपॉझिटनंतर त्वरित परताव्याच्या विनंतीपासून सावध रहा. कोणत्याही प्रकारच्या पडताळणी शिवाय युपीआय रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करू नका,' असं एसबीआयनं आपल्या मेसेजमध्ये लिहिलंय.

बनावट अॅप्सच्या माध्यमातून फसवणूक

आजकाल सायबर गुन्हेगार यूपीआयच्या नावाखाली फसवणूक करत आहेत. अॅप स्टोअरवर अनेक फेक युपीआय अॅप्स आहेत, जे खऱ्या युपीआय अॅप्ससारखे दिसतात. गुन्हेगार या फेक अॅप्सच्या माध्यमातून तुमच्या नंबरवर ट्रान्झॅक्शन करतील आणि त्याचा स्क्रीनशॉट घेतील. मग ते तुमच्याच बँकेच्या नावाने तुमच्या नंबरवर फेक मेसेज पाठवतील, ज्यात तुमच्या खात्यात पैसे आले आहेत, असं तुम्हाला सांगितलं जाईल. पुढे हे गुन्हेगार तुम्हाला फोन करतील आणि चुकून तुमच्या नंबरवर पैसे पाठवल्याचं सांगतील. त्यानंतर ते आपला युपीआय नंबर देतील आणि त्यांना लवकर पैसे परत करण्यास सांगतील.

सावध राहण्याची गरज

तुमचीही अशी फसवणूक होत असेल तर घाबरून जाऊ नका. सर्वप्रथम, आपल्याला घाईघाईत निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर, आपल्याला खरोखर पैसे मिळाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपलं बँक खातं तपासा. जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर ताबडतोब सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर फोन करा आणि आपली तक्रार नोंदवा.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियासायबर क्राइम