Join us

मोठी बातमी! व्यवसाय, नोकरीला मिळेल गती; सध्याची आर्थिक मंदी केवळ तात्पुरती; तज्ज्ञांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:06 IST

ग्रामीण मागणी व खर्चामुळे अर्थव्यवस्थेला मिळणार नवी दिशा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तुमच्या-आमच्या रोजच्या खरेदीमुळेच देशाला एक नवी दिशा मिळणार असल्याचे आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज संस्था जेफरीज, नोमुरा आणि बँक ऑफ अमेरिका यांनी म्हटले आहे. त्यानुसार, सध्याची आर्थिक मंदी तात्पुरती असून, ग्रामीण भागातील मागणी व ग्राहकांच्या खर्चामुळे भारतीय अर्थव्यवस्था नव्या गतीने पुढे जाईल.

जीएसटी कपातीचा मर्यादित परिणाम : नोमुरा

  • जीएसटीतील कपातीमुळे सैद्धांतिक दृष्टिकोनातून लोकांची खरेदीची इच्छा व क्षमता वाढू शकते. पण, प्रत्यक्षात याचा परिणाम मर्यादित होईल. 
  • महागाईत थोडी घट होईल, पण सरकारी खर्चावर फारसा परिणाम होणार नाही. आर्थिक वृद्धीसाठी इतर धोरणांची आवश्यकता असेल.

सामान्यांसाठी याचा अर्थ काय?

  • मध्यमवर्गीयांना होणारा फायदा : जीएसटीतील कपातीसह महागाई घटल्यास खरेदीसाठी अधिक पैसा उपलब्ध होईल.
  • रोजगार वाढ : ग्रामीण भागातील नागरिकांकडून विविध वस्तूंच्या मागणीत वाढ झाल्यास उत्पादन, वाहतूक, विक्री यामध्ये स्थानिक रोजगार संधी निर्माण होतील.
  • व्यवसाय संधी : लघु उद्योग, किरकोळ विक्रेते आणि एफएमसीजी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल.
  • ग्रामीण भारत देणार नवे बळ : जेफरीज

जुलैमध्ये आर्थिक निर्देशांक ५.२ टक्क्यांपर्यंत खाली आला, पण इथून पुढच्या कालावधीमध्ये मात्र ही घसरण थांबण्याची चिन्हे आहेत.खरीप पिकांची पेरणी वाढली असून, खेळता पैसा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील खरेदीशक्ती वाढण्याची शक्यता आहे.ऑटो, ट्रॅव्हल आणि कार्डद्वारे होणाऱ्या खर्चात घट दिसत असली तरी ग्रामीण भागातील मागणी स्थिर आहे.

 बँक ऑफ अमेरिकेची ग्राहकांवर मदार

  • सामान्य लोक जास्त खरेदी करतील आणि त्यातून अर्थव्यवस्था वाढेल, अशाप्रकारची धोरणे सरकार आखत आहे. याचा थेट फायदा ऑटोमोबाईल्स आणि फ्रीज, टीव्ही, मोबाइल, वॉशिंग मशीनसारख्या दीर्घकाळ वापरता येणाऱ्या वस्तूंना होईल.
  • सरकार लोकांना जास्त खरेदी करायला प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून अर्थव्यवस्था वेगाने वाढू शकेल. याचा जीडीपीवृद्धीमध्ये ३० बेसिस पॉइंट्सपर्यंत फायदा होऊ शकतो.
टॅग्स :नोकरीव्यवसाय