Join us  

बिग बुल Rakesh Jhunjhunwala यांची सरकारी कंपनीत गुंतवणूक; खरेदी केले २५०००००० शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:07 AM

Big Bull Rakesh Jhunjhunwala buys Shares : भारत सरकारचा कंपनीत 51.5% हिस्सा आहे.

ठळक मुद्देभारत सरकारचा कंपनीत 51.5% हिस्सा आहे.

बिग बुल राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhynwala) यांनी सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत सरकारी नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे ​​एकूण 2,50,00,000 शेअर्स खरेदी केले. हे तब्बल कंपनीच्या शेअर्सच्या 1.36 टक्के आहे. भारत सरकारचा कंपनीत 51.5% हिस्सा आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार सप्टेंबर तिमाहीच्या अखेर नाल्कोमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) 15.22 टक्के हिस्सा आहे.

गुंतवणूकदारांची झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीवर आणि पोर्टफोलिओवर बारीक नजर असते. झुनझुनवाला यांनी जूनच्या तिमाहीत आणखी एका पीएसयू मेटल कंपनी सेलमध्ये (SAIL) 1.39 टक्के हिस्सा खरेदी केला होता. नाल्कोचे बाजार भांडवल अंदाजे 18,000 कोटी रूपये इतके आहे. सोमवारी NSE वर 6.80 टक्क्यांच्या वाढीसह शेअर 102.90 रूपयांवर वर बंद झाला. 2021 च्या सुरूवातीपासूनच शेअरमध्ये तब्बल 132.02 टक्क्यांची वाढ झाली आहे.

नाल्कोने जून तिमाहीत 347.73 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला. वर्षभराच्या आधारावर ही 1,947 टक्क्यांची मोठी उडी आहे. पहिल्या तिमाहीत ऑपरेशन्समधून उत्पन्न 79 टक्क्यांनी वाढून 2,474.55 कोटी रूपये झाले. कोरोना महासाथीतही नाल्कोने आर्थिक वर्ष 2021 मध्ये निव्वळ उलाढालीत 8869.29 कोटी रूपये आणि 1299.56 कोटी रुपयांची निव्वळ नफा कमावला.

पत्नीच्या नावे गुंतवणूकझुनझुनवाला यांनी स्वतः आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावे गुंतवणूक केली आहे. हुरूनच्या वेल्थ लिस्टनुसार सप्टेंबरपर्यंत राकेश झुनझुनवाला आणि कुटुंबाकडे एकूण 22,300 कोटी रुपयांची संपत्ती होती. गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत तब्बल 52 टक्क्यांची वाढ झाली आहे.

नाल्को हे देशातील सर्वात मोठे एकात्मिक बॉक्साइट-अल्युमिना-अॅल्युमिनियम-पॉवर परिसरांपैकी एक आहे. कंपनीकडे ओदिशाच्या कोराटपूर जिल्ह्यातील दमनजोडी येथे 68.25 लाख टीपीए बॉक्साइट खाण आणि 21.00 लाख टीपीए (मानक क्षमता) एल्युमिना रिफायनरी आहे. तसंच 4.60 लाख टीपीए अॅल्युमिनियम स्मेल्टर आणि 1200 मेगावॅट कॅप्टिव्ह पॉवर प्लांट ओदिशातील अंगुल येथे आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजारसरकार