Join us
Daily Top 2Weekly Top 5

₹४०००००००००००० चे चेक्स अडकले, ८ लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग; बँकेच्या संपानं किती झाला परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 08:30 IST

Bank Strike Impact: आठवड्यातून पाच दिवस काम असावं या मागणीसाठी 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) नं मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत झाल्या.

Bank Strike Impact: आठवड्यातून पाच दिवस काम असावं या मागणीसाठी 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) नं मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत झाल्या. या संपामुळे चेक क्लिअरन्स, रोख रक्कम भरणं आणि काढणं यांसारख्या सेवांवर अनेक ठिकाणी परिणाम झाला. २३ जानेवारी रोजी मुख्य कामगार आयुक्तांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर युनियननं हे पाऊल उचललं असून, यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सुमारे आठ लाख कर्मचारी सहभागी झाले होते.

व्यवहारांवर झालेला परिणाम

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाचे (AIBEA) सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांनी सांगितलं की, या संपामुळे अंदाजे ४ लाख कोटी रुपयांचे चेक क्लिअरन्ससाठी अडकून पडले. अनेक ठिकाणी रोखीचे व्यवहार थांबले होते. याव्यतिरिक्त बिल ट्रेडिंग, बिलांची कपात आणि ट्रेझरीशी संबंधित कामेही बंद राहिली.

बँकिंग सेवा विस्कळीत आणि एटीएम रिकामी

मध्य प्रदेश आणि झारखंडसारख्या राज्यांतून मिळालेल्या माहितीनुसार, तिथे बँकिंग सेवांवर मोठा परिणाम झाला आणि अनेक एटीएम रिकामी झाली. देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बहुतांश शाखा एकतर पूर्णपणे बंद होत्या किंवा अंशतः सुरू होत्या. जुन्या खाजगी बँकांमधील कामकाजही ठप्प झाले होते. मात्र, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस यांसारख्या मोठ्या खाजगी बँकांच्या कामकाजावर विशेष परिणाम झाला नाही, कारण त्यांचे कर्मचारी या युनियनचा भाग नाहीत.

प्रलंबित मागणी आणि डिजिटल व्यवहार

'ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन'चे (AIBOC) सरचिटणीस रूपम रॉय यांनी सांगितलं की, डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या चर्चेत सोमवार ते शुक्रवार दरम्यान कामाचे तास दररोज ४० मिनिटांनी वाढवून सर्व शनिवारी सुट्टी देण्याचं ठरलं होतं. याबाबतच्या शिफारसी सरकारकडे पाठवण्यात आल्या होत्या, परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याला मंजुरी मिळालेली नाही. 

'नॅशनल कन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज'चे (NCBE) सरचिटणीस एल. चंद्रशेखर यांनी संपाच्या यशाचं कौतुक केलं. पाच दिवसांचा कामाचा आठवडा हा कर्मचाऱ्यांच्या कामाचा आणि खासगी जीवनाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल आणि ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील.

सामान्य जनतेला मनस्ताप

या संपामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. ज्यांना बँकेतून पैसे काढायचे होते किंवा चेक जमा करायचे होते, त्यांची कामे खोळंबली. एटीएममध्ये रोख रक्कम नसल्यामुळे अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bank strike halts ₹4 trillion, impacts 8 lakh employees.

Web Summary : A bank strike demanding a five-day work week disrupted services nationwide. Approximately ₹4 trillion in checks were held, ATMs ran dry, and 8 lakh employees participated. Normal banking operations were severely impacted, causing inconvenience to the public.
टॅग्स :बँक