Join us

व्हीपीएन ॲप, वेबसाइटवर बंदी; गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोखण्यासाठी पहिल्यांदाच मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:08 IST

सर्व्हर बंद तरी सेवा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारत सरकारने व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) ॲपवर बंदी घातली असून त्याअनुषंगाने गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून हे ॲप्स हटविण्यात आली आहेत. व्हीपीएन वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. आर्थिक लुबाडणुकीसह इतर गंभीर गुन्ह्यांसाठी याचा सुरू असलेला वापर रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले. अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंदी घालण्यात आलेल्या प्रमुख ॲप्समध्ये १.१.१.१ ॲढप (क्लाउडफ्लेअर), टच व्हीपीएन, एक्स-व्हीपीएन, हाइंड.मी आणि प्रीवाडोव्हीपीएन आदींचा समावेश आहे. ‘टेकक्रंच’ने जारी केलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये करण्यात आलेल्या नियमांनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने गुगल आणि ॲपलला व्हीपीएन ॲप्स हटविण्याचे आदेश दिले होते. गुगलला २९ ऑक्टोबरला यासंबंधीचा आदेश सरकारने जारी केला होता.

सर्व्हर बंद तरी सेवा सुरूच

  • अनेक सेवादातांनी दिलेल्या या सूचनांचे पालन करण्याऐवजी भारतातील सर्व्हर बंद करून टाकले.
  • मात्र विदेशातील सर्व्हरचा वापर करीत त्यांनी सेवा सुरुच ठेवल्या.
  • त्यामुळे सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला व हे ॲप्स स्टोअरवरून हटविण्याचे आदेश गुगल व ॲपलला दिले.

काय सूचना दिल्या?

एप्रिल २०२२ मध्ये कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने व्हीपीएन सेवादाता कंपन्यांना ग्राहकांची माहिती जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या माहितीत ग्राहकाचे नाव, पत्ता, आयपी ॲड्रेस आणि संपर्क विवरण याचा समावेश होता. ही माहिती ५ वर्षांपर्यंत संग्रही ठेवण्याच्या सूचना सेवादातांना देण्यात आल्या होत्या.