Join us

Central Bank Of India: वाईट बातमी! बडी सरकारी बँक संकटात; शेकडो शाखा बंद करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 21:11 IST

Central Bank Of India to shut down Branches: बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे अन्य़ सरकारी बँका आपल्या शाखा वाढवत असताना ही सरकारी बँक मात्र ६०० शाखा बंद करण्याच्या प्रयत्नात आहे.

गेल्या काही वर्षांपासून तोट्यात चाललेल्या सरकारी बँकेने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ही बँक आपल्या जवळपास १३ टक्के शाखा बंद करणार आहे. साडेचार हजार शाखांवरून ही संख्या ६०० ने कमी करणार आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

 सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) ने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. ही बँक आपल्या तोट्यात चाललेल्या शाखा एकतर बंद करेल किंवा त्यांचे अन्य शाखेत विलिनीकरण करेल. याबाबतचे वृत्त रॉ़यटर्स वृत्तसंस्थेच्या हवाल्याने मनीकंट्रोलने दिले आहे. 

शंभर वर्षांहून अधिक काळ देशभरात कार्यरत असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 4,594 शाखा आहेत. एकीकडे अन्य़ सरकारी बँका आपल्या शाखा वाढवत असताना ही सरकारी बँक मात्र ६०० शाखा बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. रॉयटर्सच्या दाव्यानुसार ही बँक सध्या १३ टक्के शाखा बंद करण्याच्या तयारीत आहे. यासाठीचा प्रस्ताव असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंबंधीचे कागदपत्र ४ मे रोजीच बँकेच्या मुख्यालयातून अन्य शाखा आणि विभागीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. 

2017 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने काही इतर बँकांसह सेंट्रल बँकेला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (PCA) मध्ये ठेवले होते. या बँकांवर भांडवल, बॅड लोन आणि लिव्हरेज रेशोमध्ये घोटाळा आणि आरबीआयच्या नियमांचे पालन न करण्याचे आरोप ठेवण्यात आले होते. सेंट्रल बँक वगळता, पीसीए अंतर्गत ठेवलेल्या सर्व बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारून या श्रेणीतून बाहेर पडल्या आहेत. PCA अंतर्गत असताना, बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कडक देखरेखीखाली येते. या बँकेवर कर्ज देणे, पैसे जमा करणे, शाखा विस्तार करणे, कर्ज घेणे यावर अनेक बंधने असतात. सेंट्रल बँक आता कुठे जागी झाली आहे. याबाबत एका अधिकाऱ्यानेही माहिती दिली आहे. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँक