Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता रुची सोयाच्या संचालक मंडळात बाबा रामदेव; भाऊ होणार MD, पण वार्षिक वेतन फक्त एक रुपया

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 28, 2020 17:35 IST

रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडने भाग धारकांना पाठवलेल्या नोटिशीत राम भरत (41) यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्याची परवानगी मागितली आहे. (Baba ramdev)

नवी दिल्ली - योग गुरू बाबा रामदेव, त्यांचे छोटे भाऊ राम भरत आणि जवळचे सहकारी आचार्य बालकृष्णन हे आता रुची सोयाच्या संचालक मंडळात सहभागी होणार आहेत. रुची सोयाकडे खाद्य ब्रँड न्यूट्रिलाची मालकी आहे. पतंजली आयुर्वेदने गेल्या वर्षी रुची सोयाचे अधिग्रहण केले होते. रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडने भाग धारकांना पाठवलेल्या नोटिशीत राम भरत (41) यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्याची परवानगी मागितली आहे. 

या नोटिशीत सांगण्यात आले आहे, की पतंजली आयुर्वेद लिमिटेड दिव्य योग मंदिर ट्रस्ट, पतंजली परिवहन प्रायव्हेट लिमिटेड तथा पतंजली ग्रामोद्योग यांनी गेल्या वर्षी रुची सोयाचे अधिग्रहण केले. यानंतर नव्या व्यावस्थापनाला संचालक मंडळ तयार करण्याचा अधिकार मिळाला आहे. रुची सोयावर दिवाळखोरीची तलवार लटकत होती. 

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 19 ऑगस्ट 2020ला झाली. याच दिवशी राम भरत यांना 17 डिसेंबर 2022पर्यंत व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी ते पूर्णवेळ संचालक होते. आता त्यांच्या नियुक्तीसाठी भागधारकांची मंजूरी मागवण्यात आली आहे. भरत यांना वार्षाकाठी केवळ एक रुपया वेतन दिले जाईल. 

याशिवाय आचार्य बालकृष्णन (48) यांना पुन्हा एकदा कंपनीचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनाही केवळ एक रुपया वार्षिक वेतन देण्यात आले आहे. या नोटिशीत बाबा रामदेव (49) यांना कंपनीचे संचालक म्हणून नियुक्त करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. यांच्याशिवाय गिरीश कुमार आहूजा, ज्ञान सुधा मिश्रा आणि तेजेंद्र मोहन भसीन यांना स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पतंजली आयुर्वेदने गेल्या वर्षी 4,350 कोटी रुपयांत रुची सोयाचे अधिग्रहण केले होते.

टॅग्स :रामदेव बाबापतंजलीव्यवसाय