Join us  

लहानपणी वाटलेले मी कधीच लग्न करणार नाही, राधिका स्वप्नांची राणी; व्यक्त झाले अनंत अंबानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 12:23 PM

अशी कित्येक लोक आहेत, ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त त्रास होतो, असे तिने सांगितले होते - अनंत अंबानी

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नपूर्व सोहळ्याला थाटामाटात सुरुवात होणार आहे. फेसबुकचा मार्क झकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे झाडून सर्व बडे बडे उद्योगपती, उद्योजक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. १ ते ३ मार्च असा हा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे. या पार्श्वभूमीवर अनंत अंबानी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

राधिकाला मिळवून मी भाग्यशाली बनलो आहे. ती माझ्या स्वप्नांची राणी आहे. लहानपणी मी विचार केलेला की मी कधीच लग्न करणार नाही. कारण मला प्राण्यांप्रती खूप प्रेम होते, त्यांच्या देखभालीसाठी मी समर्पित झालो होतो. परंतु, जेव्हा मी राधिकाला भेटलो तेव्हा ती माझ्यासारखीच असल्याचे दिसले. तिलाही प्राण्यांबद्दल प्रेम आणि पाळण्याची आवड आहे, असे अनंत अंबानी म्हणाले. आजतकला त्यांनी ही मुलाखत दिली. 

अनंत अंबानी यांना हेल्थ इश्यू आहेत, हे निता अंबानी यांनी सांगितले होते. त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी राधिकाने खूप साथ दिल्याचे अनंत यांनी म्हटले. मला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. माझ्या कठीण काळात राधिका नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, असे अनंत म्हणाले. 

राधिकाने मला नेहमीच बळ दिले. तिच्या आई-वडिलांनीही मला कधी आजारी असल्याची जाणीव करून दिली नाही. माझ्या कुटुंबामुळे मी आरोग्याच्या समस्येवर मात केली. राधिकाच्या येण्याने आणखी बळ मिळाले. हिम्मत हारू नको, नेहमी लढत राहा. अशी कित्येक लोक आहेत, ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त त्रास होतो, असे तिने सांगितले होते, असे अंबानी म्हणाले. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स