Join us

कर्जाच्या हप्त्यांनी दबलात? मग 'या' मार्गाने पडा बाहेर; हे फक्त आर्थिक संकट नाही, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 09:43 IST

पार्टटाइम काम, फ्रीलान्सिंग किंवा कौशल्यात वाढ करा. अतिरिक्त पैसे कमावून कर्जातून लवकर सुटका करण्यास मदत होईल. 

चंद्रकांत दडसवरिष्ठ उपसंपादक

सध्या भारतात लाखो कुटुंबे एका अदृश्य संकटाशी झुंज देत आहेत ते म्हणजे कर्ज. हे ओझे फक्त खिशावर नाही तर मनावर आणि शरीरावरही बसते. सततच्या हप्त्यांचा ताण, वाढती महागाई, नोकरीची अनिश्चितता यामुळे अनेकांना झोप लागत नाही. जास्त कर्जामुळे हृदयविकार, रक्तदाब, चिंता आणि नैराश्य या आजारांचे प्रमाणही वाढते. म्हणजेच कर्ज हे फक्त आर्थिक संकट नाही, तर आरोग्यासाठीही घातक आहे. कर्जाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. 

खर्चावर लगाम, बजेटची शिस्तपैशांचा हिशेब ठेवा. महिन्याला पैसे किती मिळतात आणि कुठे जातात, हे स्पष्ट लिहा. अनावश्यक खर्च टाळा. छोटी बचतही मोठा दिलासा देऊ शकते.

कर्ज फेडण्याची सोपी पद्धतकर्ज फेडण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला, सर्वात लहान कर्ज आधी फेडा. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. ज्या कर्जावर व्याज सर्वाधिक आहे ते आधी फेडण्याचा प्रयत्न करा. यातून पैशांची मोठी बचत होईल. यात एक समान गोष्ट आहे ती म्हणजे शिस्त, सातत्य पाळा.

कर्ज एकत्र करून भार कमी कराअनेक कर्जांऐवजी एकच कमी व्याजाचे कर्ज घ्या. हप्त्यांचा ताण कमी होईल आणि मनावरचा दबाव हलका होईल.

बँक, कर्जदारांशी संवाद साधाबँक, कर्जदारांशी बोलण्यास घाबरू नका. व्याजदर कमी करण्याची, हप्त्यांना मुदतवाढ देण्याची संधी मिळू शकते.

उत्पन्नाचे नवे दरवाजे उघडाकेवळ खर्च कमी करणे पुरेसे नाही. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधा. पार्टटाइम काम, फ्रीलान्सिंग किंवा कौशल्यात वाढ करा. अतिरिक्त पैसे कमावून कर्जातून लवकर सुटका करण्यास मदत होईल. 

टॅग्स :बँक