Anil Ambani Company: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स बिग प्रायव्हेट लिमिटेडला (Reliance Big Private Limited) लवकरच नवा मालक मिळणार आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (National Company Law Tribunal) मुंबई खंडपीठानं उद्योजक मनोजकुमार उपाध्याय आणि त्यांच्याशी संबंधित कंपनी एसीएमई क्लीनटेक सोल्यूशन्सचं (ACME Cleantech Solutions) अधिग्रहण करण्याच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. हे अधिग्रहण दिवाळखोरी प्रक्रियेतून पूर्ण केलं जाणार आहे.
काय करते कंपनी?
रिलायन्स बिगची तामिळनाडूच्या विंड एनर्जी जनरेटरची मालकी होती. आरबीपीएल तामिळनाडू वीज मंडळाला वीज पुरवठा करत होती. याशिवाय रिलायन्स बिग रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरशीही जोडलेली होती. कंपनीनं कमॉडिटी ट्रेडिंगमध्येही व्यवहार केलाय.
१००० कोटी रुपयांचं कर्ज
या प्रक्रियेनुसार आरबीपीएलला आर्थिक मदत देणाऱ्या संस्थांना ३ कोटी ५१ लाख रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर यशस्वी निविदाकाराला कंपनीत ४ कोटी रुपयांची रोख गुंतवणूक करावी लागणार आहे. आरबीपीएलवर एक हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.
कोणाला किती अधिकार?
कर्जदारांच्या समितीत अॅक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेसकडे ४८.४२ टक्के मतदानाचा अधिकार आहे. कंपनीवर ४८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. असुरक्षित कर्जदारांमध्ये जेसी फ्लॉवर्स एआरसीला ५१.५८ टक्के मतदानाचा अधिकार आहे. आरबीपीएलला ५१५ कोटी रुपये द्यावे लागतील.