Join us  

अनिल अंबानींच्या 'या' तीन कंपन्या विकल्या जाणार, कर्जबाजारी कंपन्यांचा खरेदीदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 3:33 PM

Anil Ambani: या करारासाठी लवकरच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून ग्रीन सिग्नल मिळणार आहे.

Anil Ambani Reliance Capital : एकेकाळी आशियातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत असणारे अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या कंपन्यांवर प्रचंड कर्ज असून, याच कर्जबाजारीपणामुळे कंपन्या विकण्याची वेळ आली आहे. एकीकडे मुकेश अंबानी एकामागून एक कंपन्या विकत घेत आहेत, तर दुसरीकडे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले अनिल अंबानी एकामागून आपल्या कंपन्या विकत आहेत. लवकरच अनिल अंबानींच्या हातातून तीन कंपन्या जाणार आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर कंपन्या विकल्या जातील.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदुजा समूहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) ला रिलायन्स कॅपिटलच्या तीन विमा कंपन्या विकत घेण्यासाठी मंजुरी मिळू शकते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDAI लवकरच या करारासाठी हिरवा सिग्नल देईल. नियामकाची संमती मिळताच अनिल अंबानींच्या हातातून या तीन कंपन्या निघून जातील.

अनिल अंबानी यांची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे गेल्या आठवड्यातच कर्जदारांच्या समितीने इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडला 27 मेच्या अंतिम मुदतीपर्यंत ती पूर्ण करण्यास सांगितले होते. हा करार पूर्ण करण्यासाठी कंपनी IRDAI च्या मंजुरीची वाट पाहत आहे. लवकरच ही मंजुरी मिळेल, असे मानले जात आहे.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या मंजुरीनंतर IIHL 9650 कोटी रुपयांना रिलायन्स कॅपिटल खरेदी करेल. या करारानुसार रिलायन्स कॅपिटल रिलायन्स जनरल आणि रिलायन्स हेल्थमधील 100% हिस्सा आणि रिलायन्स निप्पॉन लाइफमधील 51% हिस्सा IIHL ला विकणार आहे. यासाठी गेल्या वर्षी IIHL ने 9650 कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावली होती. आता कंपनीला 27 मे पर्यंत हे पैसे द्यावे लागणार आहेत. रिलायन्स कॅपिटलवर 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे.

टॅग्स :अनिल अंबानीव्यवसायगुंतवणूकमुकेश अंबानीरिलायन्स