Join us  

कर्जाचा बोजा वाढला; अनिल अंबानी मुंबईतलं मुख्यालय विकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 12:16 PM

रिलायन्स कॅपिटलवर 18 हजार कोटी रुपयांचं कर्ज 

मुंबई: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले उद्योगपती अनिल अंबानी मुंबईतील त्यांचं मुख्यालय विकण्याच्या तयारीत आहे. मुख्यालय विकण्याचा किंवा दीर्घकाळासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा विचार अंबानींकडून सुरू आहे. यासाठी ब्लॅकस्टोनसह काही जागतिक कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे. अनिल अंबानी पुन्हा दक्षिण मुंबईतील बॅलॉर्ड एस्टेटमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील मुख्यालय विकून किंवा भाडेतत्त्वावर देऊन कंपनीवरील कर्ज कमी करण्याचा अंबानी यांचा विचार आहे. रिलायन्स कॅपिटलवर 18 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात यातील 50 टक्के कर्जाची परतफेड करण्याचा मानस अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवला होता. सांताक्रूझमध्ये असणारं रिलासन्स सेंटर 7 लाख चौरस फुटांचं आहे. या ऑफिसच्या विक्रीतून अंबानींना दीड ते दोन हजार कोटी रुपये मिळू शकतात. अनिल अंबानी यांचा रिलायन्स समूह त्यांच्याकडे असणाऱ्या स्थावर मालमत्ता विकून जास्तीत जास्त कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंबानी यांच्यावर असलेल्या कर्जामुळे अर्थ क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी त्यांचं क्रेडिट रेटिंग कमी केलं आहे. रिलायन्सचं मुख्यालय विकण्याची जबाबदारी जेएलएलला मिळू शकते. मुंबईतील मुख्यालयासह इतरही मालमत्ता विकण्याचा विचार सुरू असल्याच्या माहितीला समूहाच्या प्रवक्त्यानंदेखील दुजोरा दिला. मात्र त्यांनी याबद्दलची अधिक माहिती देण्यास नकार दिला. ब्लॅकस्टॉननं यावर बोलण्यास नकार दिला. रिलायन्स समूहाच्या मुख्यालयाची मालकी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे. 

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स