Join us

ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:03 IST

Mahindra & Mahindra : या करारासाठी दोन्ही कंपन्यांमधील चर्चा अंतिम टप्प्यात असून येत्या काही आठवड्यांत त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. पाहा कोणती आहे ही दिग्गज कंपनी.

Mahindra & Mahindra : भारतातील दुसरी सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) लवकरच स्कोडा ऑटो फोक्सवॅगनच्या (Skoda Auto Volkswagen) भारतीय व्यवसायातील ५० टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे. या करारासाठी दोघांमध्येही चर्चा अंतिम टप्प्यात असून येत्या काही आठवड्यांत त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन, जर्मनीची दिग्गज ऑटो कंपनी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिंद्रासोबत होत असलेल्या या भारतीय व्यवसायाचं मूल्यांकन १ अब्ज डॉलर्स निश्चित करण्यात आलंय.

या व्यवहारातील व्यवहारात रोख रक्कम आणि इक्विटी या दोन्हींचा समावेश असू शकतो. मात्र, या कराराचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मनीकंट्रोलनं या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली.

महिंद्रा अँड महिंद्राला काय फायदा?

हा करार महिंद्रा अँड महिंद्रा आणि स्कोडा या दोन्ही कंपन्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या करारामुळे दोन्ही कंपन्यांना विद्यमान उत्पादन क्षमतेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास मदत होईल. पुण्यातील चाकण येथे महिंद्रा अँड महिंद्रा आणि स्कोडा या दोन्ही कंपन्यांचे मोठे उत्पादन प्रकल्प आहेत. महिंद्रा अँड महिंद्राची वार्षिक उत्पादन क्षमता ८.४ लाख कार्स आहे, तर स्कोडा ऑटो वार्षिक १.८ लाख कारचं उत्पादन करू शकते. या अधिग्रहणामुळे दोन्ही कंपन्या आपल्या प्लांटचा जास्तीत जास्त वापर करू शकतील.

याव्यतिरिक्त, या अधिग्रहणामुळे महिंद्रा अँड महिंद्राला स्कोडा ऑटोच्या हॅचबॅक आणि सेडान मॉडेल्समध्ये एन्ट्री मिळेल, या सेगमेंटमध्ये महिंद्राला आतापर्यंत इतकं यश मिळालं नव्हतं. विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात हा करार महत्त्वाचा ठरू शकतो, कारण दोन्ही कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिक कार्स प्लॅटफॉर्मसाठी आधीच करार झालाय.

को-ब्रँडिंग प्रॉडक्ट्स लाँच करण्याचीही चर्चा

या अधिग्रहणाच्या माध्यमातून को-ब्रँडिंग आणि को-लेबलिंग प्रोडक्ट्स लाँच करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा स्कोडा ऑटोच्या प्लॅटफॉर्मचा वापर करेल की नाही यावरही दोन्ही कंपन्या चर्चा करत आहेत. ही चर्चा अद्याप यशस्वी झालेली नसली, तरी सध्याच्या घडीला ती मोठी डील ब्रेकर ठरणार नाही.

स्कोडा ऑटोच्या डीलचं कारण

स्कोडा ऑटो गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत संघर्ष करत आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा ६९ टक्क्यांनी घसरून केवळ ९६ कोटी रुपयांवर आला आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील कमी विक्री आणि कच्च्या मालाची वाढलेली किंमत ही यामागची प्रमुख कारणं होती. यामुळे स्कोडा ऑटोला भारतीय बाजारपेठेत भागीदार शोधणं भाग पडलंय.

टॅग्स :स्कोडामहिंद्रा