Join us
Daily Top 2Weekly Top 5

Amul Milk Price Hike Soon: महागाई सर्वांना झोडणार! पुन्हा दूधाचे दर वाढणार; अमूलने दिले थेट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:03 IST

Milk Price Hike Soon: गेल्या महिन्यात अमूल, गोवर्धन, सोनाई यांसह सर्वच दूध कंपन्यांनी दुधाच्या दरात लीटरमागे दोन रुपयांची वाढ केली होती. परंतू महिनाभरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

दुधाचे दर वाढून महिना उलटत नाही तोच आता पुन्हा दरवाढीची टांगती तलवार सामान्यांच्या मानगुटीवर उभी ठाकली आहे. पंधरा दिवसांत इंधनाच्या दरांनी मोठी उसळी घेतलेली असताना आता सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढू लागल्या आहेत. आता पुन्हा दुधाच्या किंमती वाढण्याचे संकेत खुद्द या मार्केटचा लीडर असलेल्या अमूलने दिले आहेत. 

गेल्या महिन्यात अमूल, गोवर्धन, सोनाई यांसह सर्वच दूध कंपन्यांनी दुधाच्या दरात लीटरमागे दोन रुपयांची वाढ केली होती. परंतू महिनाभरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै २०२१ पासून सर्वच खर्चामध्ये ८ ते ९ टक्के वाढ झाली आहे. आता पुन्हा इंधनाचे दर वाढू लागले आहेत. 

ऊर्जा, लॉजिस्टिक आणि पॅकेजिंग खर्चात वाढ झाल्यामुळे अमूल दुधाच्या किमती पुन्हा एकदा वाढू शकतात, असे अमूल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. मात्र, यावेळी दर किती वाढणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. अमूलचे एमडी आरएस सोधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आता किंमती कमी होऊ शकत नाहीत परंतु वाढतील. सहकारी संघाने गेल्या दोन वर्षांत अमूल दुधाच्या दरात आठ टक्क्यांनी वाढ केली आहे. यात गेल्या महिन्यात दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

सोधी म्हणाले की, महामारीच्या काळात दुधापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रतिलिटर चार रुपयांनी वाढले आहे. त्याचबरोबर अनेक अडचणींमुळे कंपनीचा नफा कमी झाला आहे. परंतु नफावसुली हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट नाही. अमूलला मिळणाऱ्या एक रुपयापैकी ८५ पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. 

टॅग्स :दूध