बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा येथील आपला डुप्लेक्स फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट क्रिस्टल ग्रुपच्या 'द अटलांटिस' प्रकल्पाचा भाग आहे. त्यांनी तो सुमारे ८३ कोटी रुपयांना विकला. जानेवारी २०२५ मध्ये हा करार झाला. यामध्ये सुमारे पाच कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्काचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांनी एप्रिल २०२१ मध्ये ३१ कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केला होता.
इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (आयजीआर) यांच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे अपार्टमेंटच्या किमतीत तब्बल १६८ टक्क्यांनी वाढ झाली. बच्चन यांनी हा फ्लॅट नोव्हेंबर २०२१ मध्ये क्रिती सेननला भाड्यानं दिला होता. महिन्याचे भाडे १० लाख रुपये आणि सिक्युरिटी डिपॉझिट ६० लाख रुपये होतं.
अपार्टमेंट किती मोठं?
अमिताभ बच्चन यांच्या या डुप्लेक्स अपार्टमेंटचे क्षेत्रफळ सुमारे ५२९.९४ चौरस मीटर आहे. कार्पेट एरिया ५,१८५.६२ चौरस मीटर आहे. तसंच मोठं टेरेसही आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ४४५.९३ चौरस मीटर आहे. अपार्टमेंटमध्ये ६ मॅकेनाईज्ड कार पार्किंगच्या जागा देखील आहेत.
अमिताभ बच्चन यांच्याकडे असलेली ही एकमेव मालमत्ता नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांनी अंधेरी पश्चिम येथे आणखी तीन व्यावसायिक मालमत्ता सुमारे ६० कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या. त्यांचा कार्पेट एरिया ८,४२९ चौरस फूट आहे. २०२३ मध्ये त्यांनी याच इमारतीतील ८,३९६ चौरस फुटांमध्ये पसरलेली चार युनिट्स सुमारे २९ कोटी रुपयांना विकत घेतली. १ सप्टेंबर २०२३ रोजी या मालमत्ता खरेदीवर १ कोटी ७२ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आलं होतं. हा करार २० जून २०२४ रोजी करण्यात आला. अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोडवरील सिग्नेचर बिल्डिंगमधील तीन ऑफिसेससाठी हा करार होता.
अभिषेकसोबतही खरेदी केलीत अपार्टमेंट्स
याशिवाय अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी मुंबईतील मुलुंड परिसरातील ओबेरॉय रियल्टीच्या ओबेरॉय एटरना प्रकल्पात १० अपार्टमेंट खरेदी केले आहेत. या अपार्टमेंटची किंमत २४.९५ कोटी रुपये आहे. १०,२१६ चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगच्या २९ जागा आहेत. यापैकी आठ अपार्टमेंटचे कार्पेट एरिया १,०४९ चौरस फूट तर, दोन अपार्टमेंटचे कार्पेट एरिया ९१२ चौरस फूट आहे. १ कोटी ५० लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३ लाख रुपये नोंदणी शुल्क भरल्यानंतर ९ ऑक्टोबर २०२४ रोजी याची नोंदणी करण्यात आली.