Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिनी सेमीकंडक्टरला अमेरिका देणार ‘शॉक’; २०० कंपन्या प्रतिबंधित यादीत टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 10:15 IST

या कंपन्यांमध्ये चीप निर्मितीसाठी लागणारी सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. यासाठी लागणाऱ्या हायटेक तंत्रज्ञानासाठी चीन अमेरिकेकडून होणाऱ्या आयातीवर विसंबून आहे.

वॉशिंग्टन : चीनच्या सेमीकंडक्टर चीपच्या उद्योगाचा जगभरात दबदबा आहे; परंतु याला आता अमेरिकेने मोठा झटका देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. चीनच्या २०० सेमीकंडक्टर कंपन्यांना अमेरिकेने प्रतिबंधित व्यापार यादीत टाकण्याच्या दिशेने पावले उचलले आहे, असे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालात म्हटले आहे. चीनने या कृत्याच्या निषेध केला आहे.

या कंपन्यांमध्ये चीप निर्मितीसाठी लागणारी सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. यासाठी लागणाऱ्या हायटेक तंत्रज्ञानासाठी चीन अमेरिकेकडून होणाऱ्या आयातीवर विसंबून आहे. अमेरिकेच्या या पावलामुळे चिनी सेमीकंडक्टर उद्योग अडचणीत येऊ शकतो. चीनने सेमीकंडक्टर उद्योगाला चालना दिली आहे. या उद्योगावर अमेरिकेने आघात केल्याने चीनच्या पुरवठासाखळीला फटका बसणार आहे.

तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचा डाव : चीन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी या निर्बंधांची कठोर निंदा केली आहे.

निंग म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान चीनला उपलब्ध होऊ नये व सैन्य ताकद आणखी वाढू नये म्हणून अमेरिकेतेच प्रयत्न सुरू आहेत.