Join us

मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:59 IST

America Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील देशांवर कर लादून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा दावा करत आहेत, परंतु त्यांचं हे पाऊल उलटं पडताना दिसून येतंय.

America Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील देशांवर कर लादून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा दावा करत आहेत, परंतु त्यांचं हे पाऊल उलटं पडताना दिसून येतंय. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं इशारा दिला आहे की अमेरिका सध्या मंदीच्या उंबरठ्यावर आहे. तसंच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर सध्या सुरू असलेला दबाव कोविडच्या महासाथीपेक्षाही जास्त आहे. जर लवकरच यावर उपाय शोधला गेला नाही तर त्याचा अमेरिकेतील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल, असंही त्यांनी म्हटलंय.

राज्यस्तरीय आकडेवारीचं विश्लेषण केल्यानंतर, अमेरिका पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं मूडीजचे चीफ इकॉनॉमिस्ट मार्क झँडी म्हणाले. २००८ च्या महामंदीची भविष्यवाणी करणारे झँडी हे पहिले होते. सध्या या आकडेवारीचा कोविड-१९ महासाथीपेक्षाही वाईट परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत राज्यांचा वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे आणि आकडेवारीवरून असं दिसून येतंय त्यांचं उत्पादन एकतर कमी होऊ लागले आहे किंवा घसरण्याच्या मार्गावर आहे, असं ते म्हणाले.

सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या

अमेरिकेची स्थिती काय?

झँडी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक माहिती शेअर केली. अर्थव्यवस्थेत ३३ टक्क्यांची भूमिका बजावणाऱ्या राज्यांची अवस्था वाईट आहे. यापैकी अनेक राज्ये आधीच मंदीनं ग्रासली आहेत, तर काही मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. यावरून स्पष्ट होतं की अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीनं ग्रासणार आहे, असं त्यांनी नमूद केलं. २००८ च्या सुरुवातीलाही मंदीची सुरुवात अमेरिकेतून झाली होती. तेव्हाही झँडी यांनीच मंदीचा अंदाज वर्तवला होता.

अमेरिकन नागरिकांवर दुहेरी आघात

यावेळी मंदी अमेरिकन नागरिकांवर दुहेरी संकट आणेल. पहिले म्हणजे, वाढत्या महागाईमुळे त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती वाढतील आणि दुसरं म्हणजे, नोकऱ्यांवर संकट येईल. अर्थातच, कमी झालेले उत्पन्न आणि वाढत्या खर्चामुळे अमेरिकन नागरिकांवरील संकट आणखी गडद होईल. या दोन्ही संकटांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सध्या किमती वाढू लागल्या आहेत आणि त्याचा सामान्य माणसावरही परिणाम दिसू लागला आहे. भविष्यात त्याची तीव्रता किती गंभीर असेल यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार असल्याचं झँडी म्हणाले.

टॅग्स :अमेरिकाडोनाल्ड ट्रम्पनोकरी