Join us  

अदानी समुहात पुन्हा एकदा 'अमेरिकन मित्रा'ची शॉपिंग, खरेदी केले २६६६ कोटींचे शेअर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 1:43 PM

गौतम अदानी यांचे अमेरिकन मित्र जीक्युजी (GQG) पार्टनर्सचे राजीव जैन हे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.

गौतम अदानी यांचे अमेरिकन मित्र जीक्युजी (GQG) पार्टनर्सचे राजीव जैन हे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. अदानी समूहानं शुक्रवारी खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे अदानी ट्रान्समिशनमधील सुमारे ३ टक्के हिस्सा विकून जवळपास २,६६६ कोटी रुपये उभे केले. जीक्युजी पार्टनर्सनं हा संपूर्ण हिस्सा खरेदी केल्याची माहिती मार्केट पार्टिसिपेंट्सनं सांगितलं. अमेरिकन फर्मनं यापूर्वी बुधवारीच दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती.

एनएसईच्या बल्क डील आकडेवारीनुसार अदानी ट्रान्समिशनच्या प्रवर्तक फोर्टीट्यूड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटनं कंपनीतील ३३.९ दशलक्ष शेअर्स किंवा ३.०४ टक्के भागभांडवल ७८६.१९ रुपये प्रति शेअर २,६६६.४७ कोटी रुपयांना विकले. जीक्युजी पार्टनर्सनं यापैकी २१.३ दशलक्ष शेअर्स १,६७६ कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. संपूर्ण शेअर्स अमेरिकन फंडाद्वारे खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बुधवारीही केली गुंतवणूकजीक्यूजी पार्टनर्स आणि इतरांनी बुधवारी अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये १ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले. या गुंतवणूकदारांनी ब्लॉक डीलद्वारे अदानीच्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले होते. कामकाजादरम्यान अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसच्या १.८ कोटी समभागांची खरेदी-विक्री ब्लॉक डीलद्वारे झाली. त्याच वेळी, अदानी ग्रीन एनर्जीचे ३.५२ कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली.

यापूर्वीही गुंतवणूकएनआरआय गुंतवणूकदार राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील जीक्युजीनं मार्चमध्ये अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर जीक्युजीनं अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी केले होते.

टॅग्स :अदानीगुंतवणूकगौतम अदानी