Join us

अ‍ॅमेझॉनचा नफा ७९ हजार कोटी, पण टॅक्स दिला शून्य रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 15:30 IST

Amazon's Profit : जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉनची आर्थिक उलाढालही प्रचंड आहे.

वॉशिंग्टन - जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉनची आर्थिक उलाढालही प्रचंड आहे. तसेच या कंपनीला निव्वळ नफाही होत असतो. मात्र या अमेरिकन कंपनीने ११.२ अब्ज डॉलर म्हणजेच ७८ हजार ४०० कोटी एवढ्या प्रचंड नफ्यानंतरही  कुठल्याही प्रकारचा कर भरला नसल्याचे  समोर आले आहे.

अमेरिकेत अब्जावधी डॉलरच्या नफ्यानंतरही कंपन्यांना कर द्यावा लागत नाही. अमेरिकेमधील याच आर्थिक नियमांचा अ‍ॅमेझॉनला लाभ झाला आहे. इंस्टिट्युट ऑन टॅक्सेशन अँड इकॉनॉमिक पॉलिसीच्या अहवालानुसार अ‍ॅमेझॉनला सलग दुसऱ्या वर्षी सुमारे ७९ हजार कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यानंतरही कराच्या रूपात एक पै सुद्धा द्यावी लागणार नाही.

नव्या कट्स अँड जॉब्स अ‍ॅक्टनुसार अ‍ॅमेझॉनवरील टॅक्सचा दर घटून २१ टक्के झाला आहे. हा कर गतवर्षी ३५ टक्के होता. मात्र कॉर्पोरेट फायलिंगनुसार टॅक्स ब्रेक्समुळे अ‍ॅमेझॉनला ७८ हजार ४०० रुपयांच्या प्रचंड नफ्यानंतरही सरकारला एक रुपयासुद्धा टॅक्स द्यावा लागणार नाही.

 आयटीइपीचे डायरेक्टर ऑफ फेडरल टॅक्स पॉलिसी स्टीव्ह वामहॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून ते आपल्या करधोरणाची माहिती उघड करत नाहीत. त्यामुळे अ‍ॅमेझॉनने कुठल्या प्रकारच्या कराचा फायदा उचलला हे सांगणे कठी आहे. मात्र ते केवळ अस्पष्टपणे टॅक्स क्रेडिटची चर्चा करत असतात.अ‍ॅमेझॉनने टीसीजेएअंतर्गत मिळणारे नवे ब्रेक्स तसेच लूप होल्सचा फायदा उचलला आहे. मात्र हे पहिल्यांदाच घडलेले नाही. यापूर्वीही अ‍ॅमेझॉनने काही वेळा सरकारला कराच्या रुपात काहीही दिले नव्हते. २०१७ मध्ये अॅमेझ़ॉनला ५.६ अब्ज डॉलर (३९ हजार २०० कोटी रुपये) एवढा नफा झाला होता. मात्र त्यांनी कररूपात एक डॉलरसुद्धा सरकारला दिला नव्हता. तसेच २०१८ मध्येसुद्धा अ‍ॅमेझ़ॉनने काहीही टॅक्स दिला नव्हता.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनव्यवसायकरअमेरिका