Join us

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टची चौकशी करण्याचे आदेश; व्यावसायिक क्लृप्त्यांचा कंपन्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 02:08 IST

सोमवारी दिलेल्या आदेशात स्पर्धा आयोगाने म्हटले की, या कंपन्यांविरोधातील आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य दिसते. त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली : व्यावसायिक स्पर्धांविरोधी व्यावसायिक क्लृप्त्या वापरून बाजार प्रभावित केल्याच्या आरोपावरून अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांची चौकशी करण्याचे आदेश भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) दिले आहेत. नियमबाह्य पद्धतीने मोठी सूट देणे, खास आपल्या प्लॅटफॉर्मवर विकण्यासाठी (एक्सक्लुझिव्ह) विशेष ब्रँड्स लाँच करणे आणि ठरावीक मोबाइल फोनला प्राधान्य देणे, असे आरोप दोन्ही कंपन्यांवर आहेत.

सोमवारी दिलेल्या आदेशात स्पर्धा आयोगाने म्हटले की, या कंपन्यांविरोधातील आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य दिसते. त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. सीसीआय महासंचालक याची चौकशी करून अहवाल देतील. अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी जेफ बेझोस हे याच आठवड्यात भारत दौऱ्यावर येत असताना हा चौकशी आदेश सीसीआयने दिला आहे. बेझोस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांची भेट घेणार आहेत. अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्ही चौकशी आदेशाचे स्वागत करतो. अ‍ॅमेझॉनविरोधातील तक्रारींचे निवारण करण्याची संधी यानिमित्ताने आम्हाला मिळणार आहे. आम्ही सीसीआयला पूर्ण सहकार्य करू.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनफ्लिपकार्ट