Join us

Alibaba: चीनमध्ये मंदीचे सावट! दिग्गज टेक कंपनी अलीबाबाने 10 हजार कर्मचाऱ्यांना दिले नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 17:56 IST

Alibaba: अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांना मंदीचा सामना करावा लागत आहे.

नवी दिल्ली: जगात मंदीचे सावट असतानाच अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी सुरू केली आहे. कमाईच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या वॉलमार्टने अलीकडेच आपल्या 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यानंतर आता चीनची दिग्गज टेक कंपनी अलीबाबाने(Alibaba) आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने जून तिमाहीत 9,241 हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे.

अलीबाबाचे निव्वळ उत्पन्न जूनच्या तिमाहीत 50 टक्क्यांनी घसरून 22.74 अब्ज युआन ($3.4 अब्ज)वर आले. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 45.14 अब्ज युआन होते. रिपोर्टमध्ये असे म्हटले की, कंपनी आपल्या खर्चात कपात आणि कार्यक्षमता वाढविण्यावर काम करत आहे. चीन ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ आहे, परंतु अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे ई-कॉमर्सचा वापर कमी झाला आहे. या सर्व बाबींचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवरही झाला असल्यामुळेच कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

टेक कंपन्यांनी 32 हजार कर्मचाऱ्यांना काढलेया वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीने 13,616 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे अहवालात म्हटले आहे. मार्च 2016 नंतर प्रथमच कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झांग योंग म्हणाले की, कंपनी यावर्षी सुमारे 6,000 नवीन उमेदवारांची भरती करणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत. Crunchbase च्या अहवालानुसार, या कंपन्यांनी गेल्या महिन्यात 32,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. या कंपन्यांमध्ये Twitter, TikTok, Shopify, Netflix आणि Coinbase यांचा समावेश आहे.

जॅक मा अडचणीतअलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे एकेकाळी आशियातील सर्वात मोठे श्रीमंत होते, परंतु चीन सरकारच्या विरोधात केलेल्या टिप्पणी त्यांना महागात पडली. सरकारी नियामकांच्या दबावामुळे जॅक मा एंट ग्रुपवरील नियंत्रण सोडण्याचा विचार करत असल्याची बातमी गेल्या महिन्यात आली होती. गेल्या वर्षापासून, चिनी नियामक टेक कंपन्यांवर कडक कारवाई करत आहेत. हेच कारण आहे की जॅक मा आपल्या मतदानाचा हक्क काही एंट अधिकार्‍यांना देऊन आपले नियंत्रण सोडू शकतात. $35.4 अब्ज संपत्तीसह जॅक मा सध्या आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत 34 व्या क्रमांकावर घसरले आहेत.

टॅग्स :अलीबाबाचीनअमेरिकाव्यवसाय