Join us

एअरटेलने एजीआर देयतेपोटी आणखी भरले ८,००४ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 06:01 IST

समायोजित सकळ महसुलाच्या (एजीआर) देयतेपोटी एअरटेलने आणखी ८,००४ कोटी रुपयांचा भरणा दूरसंचार खात्याकडे केला आहे.

नवी दिल्ली : समायोजित सकळ महसुलाच्या (एजीआर) देयतेपोटी एअरटेलने आणखी ८,००४ कोटी रुपयांचा भरणा दूरसंचार खात्याकडे केला आहे. याआधी १७ फेब्रुवारी रोजी कंपनीने १० हजार कोटी भरले होते.नियामकीय दस्तावेजात ही माहिती कंपनीने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी हा भरणा केल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने वित्त वर्ष २००६-०७ पासून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत एजीआर देयतेचे स्वमूल्यांकन केले आहे. त्यानुसार हा भरणा करण्यात आला आहे. २९ फेब्रुवारी २०२० पर्यंतच्या व्याजाचाही त्यात समावेश आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सादर केलेल्या नियामकीय दस्तावेजात म्हटले आहे की, कंपनीने १७ फेब्रुवारी २०२० रोजी हंगामी स्वरूपात १० हजार कोटींचा भरणा केला होता. त्यानंतर संपूर्ण थकबाकी निरस्त (फुल अँड फायनल) करण्यासाठी अतिरिक्त ३००४ कोटी रुपये भरण्यात आले. भारती एअरटेल, भारती हेक्सॅकॉम आणि टेलिनॉर इंडिया यांच्या देयतेचा त्यात समावेश आहे. याशिवाय दूरसंचार विभागासोबतच्या अंतिम समेटाशी अधीन राहून आणखी ५,००० कोटी रुपये हंगामी स्वरूपात भरले आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांकडे एजीआरचे १.४७ लाख कोटी रुपये थकले आहेत. त्याविरुद्ध कंपन्यांचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले असून रकमेचा भरणा करण्याचे कडक आदेश दिले आहेत.>दूरसंचार विभागाच्या अंदाजपत्रकानुसार एअरटेलकडे एकूण ३५,५८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात परवाना शुल्क, स्पेक्ट्रम वापर शुल्क, दंड आणि व्याज यांचा त्यात समावेश आहे.एअरटेलने म्हटले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने २४ आॅक्टोबर २०१९ रोजी एजीआरबाबत दिलेल्या आदेशाचे संपूर्ण पालन आम्ही आता केले आहे.’

टॅग्स :एअरटेल