Join us

१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:20 IST

Airtel Perplexity Pro : भारती एअरटेलने आपल्या ३६ कोटी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. कंपनीने पर्प्लेक्सिटी एआय सोबत भागीदारी केली आहे.

Airtel Perplexity Pro : सध्या प्रत्येकजण आर्टिफिशियल इंटिलिजेन्स अर्थात एआयची चर्चा करताना पाहायला मिळत आहे. नुकतेच गुगलने भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचे एआय मॉडेल जेमिनीचे प्रिमियम व्हर्जन वर्षभर मोफत देण्याची घोषणा केली. यात आता टेलिकॉम मार्केटमधील आघाडीची कंपनी एअरटेलनेही उडी घेतली आहे. भारती एअरटेलने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने पर्प्लेक्सिटी एआय (Perplexity AI) सोबत भागीदारी केली असून, या अंतर्गत एअरटेल आपल्या सर्व ३६ कोटी ग्राहकांना पर्प्लेक्सिटी प्रोचे वार्षिक सबस्क्रिप्शन मोफत देणार आहे.

एअरटेल ग्राहकांना AI ची खास भेट!ही सुविधा एअरटेलच्या सर्व मोबाईल, वायफाय आणि डीटीएच ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. ग्राहक एअरटेल थँक्स अॅप (Airtel Thanks App) द्वारे ही सेवा सहजपणे सक्रिय करू शकतात. ही भारतातील अशा प्रकारची पहिलीच जनरेटिव्ह एआय (Generative AI) भागीदारी आहे. हा उपक्रम भारतातील जनरेटिव्ह एआयच्या दिशेने एक मोठे पाऊल मानला जात आहे, ज्यामुळे विद्यार्थी, गृहिणी आणि व्यावसायिकांसाठी माहिती शोधण्याची आणि शिकण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल.

पर्प्लेक्सिटी प्रो म्हणजे काय आणि ते का खास आहे?पर्प्लेक्सिटी हे एक AI-पॉवर्ड सर्च आणि आन्सर इंजिन आहे. हे फक्त लिंक्सची यादी देत नाही, तर तुमच्या प्रश्नाचे अचूक उत्तर शोधते आणि ते सोप्या भाषेत सादर करते.

पर्प्लेक्सिटी प्रो सह वापरकर्त्यांना मिळणारे फायदे

  • दररोज अधिक व्यावसायिक शोध : तुम्ही अधिक गुंतागुंतीचे आणि सखोल प्रश्न विचारू शकता.
  • प्रगत AI मॉडेल्समध्ये प्रवेश: GPT-4.1 आणि क्लॉड सारख्या अत्याधुनिक AI मॉडेल्सचा वापर करता येईल.
  • इमेज जनरेशन : मजकूरातून इमेज तयार करण्याची सुविधा.
  • फाइल अपलोड आणि विश्लेषण : फाइल्स अपलोड करून त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता.
  • नाविन्यपूर्ण साधने: पर्प्लेक्सिटी लॅब्ससारखी अनेक नवीन साधने वापरता येतील.

आंतरराष्ट्रीय स्तरावर या संपूर्ण सुविधेची किंमत सुमारे १७,००० आहे, पण आता ती एअरटेल ग्राहकांना एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत दिली जात आहे.

विद्यार्थ्यांपासून ते गृहिणींपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त!हे साधन केवळ तंत्रज्ञानप्रेमींपुरते मर्यादित नाही. एअरटेल आणि पर्प्लेक्सिटीची भागीदारी भारतातील कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थी आता ऑनलाइन माहितीच्या जगात सखोल संशोधन करू शकतील आणि त्यांच्या प्रकल्पांमध्ये आणि असाइनमेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. गृहिणी पाककृतींपासून ते घरगुती नियोजनापर्यंत सर्व गोष्टींमध्ये हे AI एक उत्तम सहाय्यक बनू शकते. तर व्यावसायिक काही मिनिटांत त्यांच्या बजेट आणि वेळेनुसार कुटुंबाच्या सहलीचे नियोजन करू शकतात, ज्यामुळे वेळेची बचत होईल.

वाचा - काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

डिजिटल क्रांतीकडे आणखी एक पाऊलभारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि एमडी गोपाल विठ्ठल यांनी याला 'गेम-चेंजिंग भागीदारी' म्हटले आहे. ते म्हणाले की ही भागीदारी भारतातील ग्राहकांना डिजिटल जगात आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करेल. पर्प्लेक्सिटीचे सह-संस्थापक आणि सीईओ अरविंद श्रीनिवास यांच्या मते, भारतातील प्रत्येक विद्यार्थी, व्यावसायिक किंवा गृहिणीसाठी व्यावसायिक दर्जाचे AI उपलब्ध करून देणे हे त्यांच्या ध्येयाचा एक भाग आहे.

टॅग्स :एअरटेलआर्टिफिशिअल इंटेलिजन्सस्मार्टफोनतंत्रज्ञान