जर तुम्ही ट्रूकॉलरसारखे ॲप वापरत नसाल तर अनोळखी नंबरवरून येणारा कोणता कॉल स्पॅम कॉल आहे आणि कोणता कॉल तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे हे शोधणं तुमच्यासाठी खूप अवघड जात असेल. पण आता हे शोधणं सोपं झालंय. दूरसंचार क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी एअरटेलनं बिझनेस नेम डिस्प्ले सर्व्हिस नावाची खास सेवा सुरू केली आहे. एअरटेलची ही सेवा ट्रूकॉलरला टक्कर देईल. म्हणजेच आता कॉल करणाऱ्या बिझनेसचं नावही दिसेल.
याचा मोठा फायदा होईल कारण यामुळे स्पॅम कॉलपासून ग्राहकांची सुटका होईल. पुढे जाऊन ग्राहकांची नावं दर्शविणारी सेवाही सुरू केली जाऊ शकते. एअरटेल बिझनेसनं आज 'बिझनेस नेम डिस्प्ले' लाँच करण्याची घोषणा केली, जी उद्योजकांसाठी ग्राहकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.
एअरटेलनं भारतातील पहिलं अँटी-स्पॅम नेटवर्क लाँच करून आपल्या ग्राहकांना दिलासा दिला होता. ग्राहकांमध्ये जागरुकताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे स्पॅम नंबरवरील कॉलकडे अधिक लोक दुर्लक्ष करताना दिसताहेत.