Join us

Airtel Data Breach: ३७.५ कोटी युझर्सचा डेटा लीक? पाहा एअरटेलनं यावर काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 12:40 IST

Airtel Data Breach: ३७.५ कोटी एअरटेल ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. जाणून घेऊ यावर काय म्हटलंय एअरटेलनं.

Airtel Data Breach: ३७.५ कोटी एअरटेल ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. परंतु एअरटेलने या वृत्ताचं खंडन केलंय. एअरटेलच्या प्रवक्त्यानं यासंदर्भातील माहिती दिलीये. प्राथमिक चौकशीत एअरटेल सिस्टममध्ये डेटा चोरीची पुष्टी झालेली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. यापूर्वी डार्क वेबबाबत माहिती देणाऱ्या एका व्यक्तीनं दावा केलेला की, एअरटेल इंडियाच्या ३७.५ कोटी युजर्सचा डेटा लीक झाला असून तो विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये युजर्सची नावं, कौटुंबिक माहिती, कॉन्टॅक्ट डिटेल्स, आधार आदींची माहिती असल्याचं म्हटलंय. दाव्यानुसार, हे तपशील डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, एअरटेलनं आपल्या युजर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित असून केले जाणारे दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे.

एका सोशल मीडिया युझरनं यासंदर्भात स्क्रिनशॉट शेअर करत माहिती शेअर करत माहिती दिली आहे. हा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. हा रिपोर्ट फेक असल्याची प्रतिक्रिया एअरटेलच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. "एअरटेलच्या ग्राहकांच्या डेटाशी तडजोड करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. काही लोकांकडून एअरटेलची प्रतिष्ठा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही सखोल चौकशी केली आहे आणि कोणत्याही प्रकारचा डेटा लिक झालेला नाही," असं एअरटेलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. 

सर्व्हरवर कोणताही सायबर हल्ला झालेला नाही किंवा डेटा लीकही झालेला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 

हॅकर ग्रुपचे नाव 'झेनझेन' असं सांगितलं जात आहे. या ग्रुपच्या अकाऊंटमधील डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी लिस्ट करण्यात आलाय. या डेटाची किंमत ५०,००० डॉलर म्हणजेच जवळपास ४१ लाख रुपये ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

टॅग्स :एअरटेल