Join us  

एअर इंडियाचे वैमानिक, कर्मचारी ८ जानेवारीपासून जाणार संपावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 3:39 AM

कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या मुंबईतील बैठकीत याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली.

मुंबई : एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या भवितव्याची खात्री नसल्याने व अनेक अभियांत्रिकी कर्मचारी व वैमानिकांचे वेतन व थकबाकी न मिळाल्याने एअर इंडियाचे कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावर जाण्याच्या विचारात आहेत. संप वा राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव हे दोन मार्ग आमच्यापुढे आहेत. त्यापैकी कोणता मार्ग स्वीकारायचा, यावर लवकरच निर्णय होईल, असे कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या मुंबईतील बैठकीत याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. एअर इंडियाच्या खासगीकरणाची जोरदार तयारी केंद्र सरकारने चालवली आहे. पण ती करताना आम्हाला विचारातही घेतलेले नाही. त्यातच एअर इंडियाने अनेक अधिकारी, कर्मचारी व वैमानिक यांचे वेतन थकविले आहे. ते लवकरात लवकर मिळावे आणि सर्व थकबाकी लगेच देण्यात यावी, अशी संघटनांची मागणी आहे.येत्या ८ जानेवारीपासून खरोखरच संप सुरू केला, तर त्याचा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर विपरित परिणाम होईल व प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. सरकार आम्हाला वेठबिगाराप्रमाणे वागवत आहे. एकीकडे पगार व थकबाकी नाही आणि दुसरीकडे परस्पर एअर इंडियाच्या खासगीकरणाची तयारी सुरू आहे. खासगीकरणानंतर आमच्या नोकºया, रोजगारांचे काय होणार, हे सांगायलाही सरकार नाही. त्यामुळे आम्ही वेळ पडल्यास कदाचित राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडेही जाऊ , असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.६५ वैमानिकांनी दिले राजीनामेएअर इडियाकडे ८00 वैमानिक असून, त्यापैकी ६५ जणांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यांना सहा महिन्यांची नोटिस द्यावी लागते. तीही आता पूर्ण होत आली आहे.त्यानंतर एअर इंडियाच्या विमानसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत २६ जणांचे राजीनामे स्वीकारण्यात आले असून, इतरांनी ते मागे घ्यावेत, असा प्रयत्न एअर इंडियाचे प्रशासन करीत आहे.

टॅग्स :एअर इंडियाव्यवसाय