Join us  

Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 1:07 PM

एअर इंडिया एक्स्प्रेसनं (Air India Express) अचानक आजारी रजेवर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात मोठं पाऊल उचललं असून सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसनं (Air India Express) अचानक आजारी रजेवर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात मोठं पाऊल उचललं असून सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कामामध्ये अडथळा आणणं आणि नियुक्ती अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीनं या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलंय. तसंच आजपासून विमानसेवा सुरळीत ठेवण्याचा आणि कमीत कमी कॅन्सलेशनसाठी मोजकीच उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसनं कामावर न आल्याने सुमारे २५ कर्मचाऱ्यांना (केबिन क्रू मेंबर्स) बडतर्फ केलं आहे. एअरलाइननं केबिन क्रूला गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कामावर परतण्याचा अल्टिमेटम दिला आहे. 

टाऊन हॉल मीटिंग बोलावली 

सामूहिक सिक लीव्हवर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना एअर इंडियाने दुपारी ४ वाजेपर्यंत रोस्टरनुसार कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तसं न केल्यास व्यवस्थापन कारवाई करू शकते. दरम्यान, सीईओंनी यासंदर्भात आज संध्याकाळी टाऊन हॉलची बैठकही बोलावली आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी पत्र लिहून आपल्या समस्येवर मोकळेपणाने चर्चा करावी, असं सांगण्यात आलंय. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी सामूहिक सिक लीव्हचा पुनर्विचार करून कंपनी व प्रवाशांच्या हिताचा निर्णय घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. याबाबत प्रत्येक स्तरावर वाटाघाटी करण्याची व्यवस्थापनाची तयारी आहे. 

 

काय आहे प्रकरण? 

एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० हून अधिक वैमानिक आणि केबिन क्रू कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक आजारपणाचे कारण देत सामूहिक रजा घेतल्याचा फटका कंपनीच्या देशाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवेला बसला. त्यामुळे बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल ९० विमानं रद्द झाली. परिणामी एअर इंडियाच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेची गंभीर दखल घेतली असून कंपनीकडून अहवाल मागविला आहे. 

ही अपरिस्थिती अनुभवलेल्या प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्ही आज २९२ उड्डाणं चालवणार आहोत. एअर इंडिया आमच्या २० मार्गांवर सेवा देणार आहे. मात्र, वाहतूक सुरळीत व्हावी, विलंब कमी व्हावा आणि कॅन्सलेशन कमी व्हावं यासाठी आज ७४ उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. विमानतळावर जाण्यापूर्वी उड्डाणांची स्थिती तपासावी असं आवाहन करत आहोत, असं एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याचं वक्तव्य समोर आलंय.

टॅग्स :एअर इंडिया