Join us  

एअर इंडियाचे 700 कर्मचारी होणार बेघर, फ्लॅट खाली करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 4:03 PM

तोट्यात सुरू असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं स्वतःच्या 700 कर्मचाऱ्यांना फ्लॅट खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्लीः तोट्यात सुरू असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं स्वतःच्या 700 कर्मचाऱ्यांना फ्लॅट खाली करण्याचे आदेश दिले आहेत. एअर इंडियाचे हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीतल्या वसंत विहारमधील एअर इंडिया कॉलनीमध्ये राहतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच त्या नोटिशीमध्ये कॉलनीमधील जमिनीचा लिलाव करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना हे फ्लॅट खाली करण्यास बजावलं आहे.या कॉलनीमध्ये 810 फ्लॅट आहेत, ज्यातील 676 फ्लॅटमध्ये कर्मचारी स्वतःच्या कुटुंबीयांबरोबर राहतात. अशातच या कर्मचाऱ्यांना फ्लॅट रिकामी करण्याच्या अडचणींचा सामना करावा लागेल. एअर इंडियाचे जे कर्मचारी या कॉलनीमध्ये राहतात, त्यांचं दिल्लीत दुसरं घर नाही. अनेक कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मुलं जवळच्याच शाळेत शिकत आहेत. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच ही कॉलनी विमानतळापासून फारच जवळ आहे. वसंत विहारमधलं मेट्रो स्टेशनही या कॉलनीपासून पायी चालत जावं एवढं जवळ आहे.कॉलनीजवळ वसंत लोक मार्केट आणि हॉटेल वसंत कॉन्टिनेंटलही आहे. वसंत विहार दक्षिण दिल्लीतल्या सर्वात उच्चभ्रू कॉलनीपैकी एक आहे. इथल्या दोन कमऱ्यांच्या फ्लॅटचं भाडंसुद्धा 60 हजार रुपयांपासून सुरू होते. इथे फारच तीन ते चार मजल्यांच्या इमारती आहेत. जास्त उंचीच्या इमारती(टॉवर) इथे नाहीत. एअर इंडिया कर्मचाऱ्यांना दुसरीकडे घरं मिळवून देण्यासाठी कमिटी स्थापन करणार आहे. समजा कंपनीनं भाडेतत्त्वावर घरं घेतली, तर कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा एचआरए आणि लायसन्स फीस मिळणार नाही. सरकारी फ्लॅट खाली करण्याचे आदेश मिळाल्यानंतर एअर इंडिया स्वतःच्या कर्मचाऱ्यांना घरं शोधण्यासाठी मदतही करणार आहे.यासाठी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांपासून 25 हजार रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. त्याच्याशिवाय कंपनी ब्रोकरेज चार्ज आणि सामान शिफ्ट करण्याचा चार्जही कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार आहे. एअर इंडियावर जवळपास 55 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठीच सरकार देशातील विविध शहरांतील मालमत्ता आणि संपत्ती विक्रीत काढत आहे. या संपत्तीत प्लॉट, फ्लॅट आणि इतर इमारतींचा समावेश आहे. सरकारला आशा आहे की, ही संपत्ती विकल्यानंतर 900 हजार कोटी रुपयांची भरपाई केली जाईल. सरकारनं 76 टक्क भागीदारी विकण्यासाठी गेल्या वर्षी एक प्रस्ताव दिला होता. परंतु एअर इंडियाला खरेदी करण्यास कोणीही पुढे आलेलं नाही. 

टॅग्स :एअर इंडिया